निकाल ठरविणार कोल्हापूरची राजकीय दिशा

निकाल ठरविणार कोल्हापूरची राजकीय दिशा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूरच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हे एवढी घुसळण लोकसभा निवडणुकीत झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत सतेज पाटील ज्या संजय मंडलिक यांना विजयी करा म्हणून सांगत होते, तेच आता त्यांना पराभूत करा, म्हणून सांगत होते. तर संजय मंडलिक यांच्याकडून पराभूत झालेले धनंजय महाडिक आता मंडलिक यांना विजयी करा, म्हणून सांगत होते. राजकारणातला हा बदल बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून जनतेने पाहिला. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर या राजकारणाचा दुसरा अंक सुरू होणार आहे. तर विधानसभेला तिसर्‍या अंकाची घंटा वाजेल. तोवर पंचगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक अशी लढत झाली. मुळात काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. तेव्हा पी. एन. पाटील व सतेज पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली. मात्र, या दोघांनाही लोकसभेला जायची इच्छा नसल्यामुळे ‘पहले आप, पहले आप’ करत इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला व शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हातकणंगले मतदार संघात शिवसेनेची उमेदवारी कोणाला, यावरून शेवटपर्यंत घोळ घातला गेला. राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायचा, का स्वतंत्र उमेदवार द्यायचा, याचा घोळ शेवटी मिटला. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली. तेथे शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात लढत होत आहे.
या निवडणुकीच्या निकालावर जिल्ह्याचे भावी राजकारण अवलंबून आहे. महाडिक यांच्या राजकारणाचा बेस असणारा व 3 हजार 500 कोटी रुपयांची उलाढाल असणारा गोकुळ दूध संघ सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांनी खेचून आणला. मात्र, लोकसभा निवडणुकीत गोकुळमधील सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या एकमुखी सत्तेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार हादरा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष असणारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे महातातडीने महायुतीच्या प्रचारात रूजू झाले. तर संचालक मंडळात विभागणी झाली. पाच संचालक विरोधात निवडून आले होते. त्यापैकी शौमिका महाडिक यांनीच तेवढी आपली विरोधाची धार कायम ठेवली आहे.
‘गोकुळ’मध्ये राजकारणात नवा अध्याय
लोकसभेच्या प्रचारात चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह काही संचालकांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी आपले राजकीय वजन खर्ची घातले. आता ते किती उपयोगी ठरले, हे निवडणूक निकालानंतर दिसेल. त्यानंतर राजकारणाचा नवा अध्याय गोकुळमध्ये लिहिला जाईल. तर काही संचालकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने आपली ताकद उभारली.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गडावर भाजप नेत्यांसाठी लाल गालीचा
जिल्हा बँक म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण आता त्याच बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार चळवळीत भाजपचा प्रवेश होणार आहे. भाजपच्या नेत्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संस्थेत लाल गालीचा अंथरला जाणार आहे. बदलत्या राजकारणाची ही चुणूक असेल. अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचे महत्त्व सहकारात वाढणार की कमी होणार, याचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालातच दडलेला आहे.
…तर सूत्रे सतेज, पी. एन. यांच्याकडे
शाहू महाराज विजयी झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्या हाती एकवटतील. सत्यजित पाटील विजयी झाल्यास दोन्ही पाटील यांचे नेतृत्व आणखी भक्कम होईल व संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण त्यांच्या हाती एकवटेल.
.. तर सूत्रे मुश्रीफ, महाडिक यांच्याकडे
संजय मंडलिक विजयी झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक व संजय मंडलिक यांच्या हाती येतील. धैर्यशील माने निवडून आल्यास या नेतृत्वाची फळी भक्कम होईल. याचे राजकारणावर तसेच सहकारी संस्थांवर मोठे परिणाम होणार आहेत.