संजीव गोयंकांच्या डिनर डिप्लोमसीनंतरही केएल राहुलचे चाहते नाराजच

संजीव गोयंकांच्या डिनर डिप्लोमसीनंतरही केएल राहुलचे चाहते नाराजच

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : IPL 2024 : काही दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका कर्णधार के. एल. राहुलवर भडकल्याचे दिसले होते. मैदानातच घडलेल्या या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती. अनेकांनी गोयंका यांच्यावर टीका केली होती. हा गदारोळ शांत करण्यासाठी गोयंका यांनी के. एल. राहुलसोबत डिनर घेतल्याचे समजते आहे; परंतु लोकांना ही डिनर डिप्लोमसी पटलेली नसून गेलेली वेळ परत येत नसल्याचे राहुलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
लखनौ सुपर जायंटस् संघाची कामगिरी आयपीएल 2024 स्पर्धेत संमिश्र झाली आहे. ते 13 वा सामना मंगळवारी (14 मे) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळला आहे. त्याआधी के. एल. राहुल आणि संजीव गोयंका यांच्या भेटीदरम्यानचे फोटो व्हायरल झाले आहेत. (IPL 2024)
गेल्या आठवड्यात त्यांना सनरायझर्स हैदाबादविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. लखनौविरुद्ध हैदराबादने 167 धावांचे लक्ष्य 10 षटकांच्या आतच पूर्ण केले होते. यानंतर एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये लखनौ संघाचे संघमालक संजीव गोयंका कर्णधार के. एल. राहुलवर भडकल्याचे दिसले होते. ते सामन्यात झालेल्या पराभवानंतर स्टेडियममध्येच के. एल. राहुलवर चिडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती. अनेकांनी गोयंका यांच्यावर टीका केली होती. (IPL 2024)
इतकेच नाही, तर के. एल. राहुलला लखनौच्या कर्णधारपदावरून हटवण्यात येऊ शकते, अशी चर्चा होती; परंतु आता त्या घटनेनंतर सोमवारी गोयंका यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या घरी के. एल. राहुलबरोबर स्नेहभोजन घेतले असल्याचे समजते आहे. त्यांच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (IPL 2024)
त्यामुळे देखील अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. काहींनी घडलेल्या घटनेनंतर के. एल. राहुलची भेट घेतल्याबद्दल संजीव गोयंकांचे कौतुक केले आहे, तर काहींना मात्र ही भेट पटलेली नाही. काही युजर्सचे म्हणणे आहे की, एकदा गेलेला सन्मान परत नाही येत, तर काही युजर्सने म्हटले आहे की, जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले आहे. आता गेलेली वेळ आणि झालेला अपमान भरून येणार नाही. एकंदरीतच गोयंका यांची डिनर डिप्लोमसी चाहत्यांना आवडलेली नाही. (IPL 2024)