Weather Report | पुणे शहरासह जिल्ह्यात वार्‍यासह पावसाचा कहर

Weather Report | पुणे शहरासह जिल्ह्यात वार्‍यासह पावसाचा कहर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे शहरासह जुन्नर, शिरूर, राजगडसह बारामती तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. जुन्नर तालुक्यात आणे माळशेजला गारपीट झाली. त्याचा परिणाम शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावर झाला. पिंपरी-चिंचवड भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पुणे शहरात मतदान संपण्याच्या सुमारास साडे सहा वाजता आभाळ काळ्याभोर ढगांनी भरून आले आणि जोरदार पावसास सुरूवात झाली. पेठांसह उपनगरात पावसाने दाणादाण उडवून दिली. शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, मगरपट्टा, विद्यापीठ रस्ता, औंध, पाषाण, बाणेर भागांत जोरदार पावसाने रस्त्यांवर पुन्हा तळी साचली. आजच्या पावसाची नोंद मात्र वेधशाळेने घेतली नाही.
शिरूर तालुक्यात जांबूत, चांडोह, न्हावरा, मांडवगण फराटा, शिरूर शहरात जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे इनामगावच्या यात्रेत आलेल्या व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. बारामती तालुक्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. राजगड तालुक्यातही पावसामुळे पानशेत, वेल्हे बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी घुसले. पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी पिकांचेही नुकसान झाले.
हेही वाचा

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
मतदानाचा टक्का घसरला; पहा कोणत्या मतदारसंघांत किती झाले मतदान
लंडनच्या तरूणाने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क