व्यापार्‍यांना कळणार मालगाडीचे लोकेशन

व्यापार्‍यांना कळणार मालगाडीचे लोकेशन

विजय थोरात

सोलापूर : रेल्वेने मालवाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवासी गाडीचे लोकेशन जसे कळते त्याप्रमाणे व्यापार्‍यांनादेखील आता घरबसल्या त्यांचे पार्सल कोठे आहे, कधी पोहोचणार आहे, याची अचूक माहिती कळणार आहे.
रेल्वेने तयार केलेल्या ‘एफओआयएस’ सॉफ्टवेअर (मालवाहतूक ऑपरेशन्स माहिती प्रणाली) च्या मदतीने आता मालगाड्यांची माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याद्वारे आता मालगाडीतून येणारे तुमचे पार्सल किती अंतरावर पोहोचले आहे, हे घरबसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची आणि सुविधांची विशेष काळजी घेते. यासंदर्भात विभागाकडून वेळोवेळी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले जातात. आतापर्यंत प्रवासी गाडीचे लोकेशन ट्रॅक करण्याची सुविधा मिळत होती; पण आता मालगाड्यांनाही ट्रॅक करता येणार आहे. रेल्वेच्या ‘एफओआयएस’ सॉफ्टवेअरमध्ये ही सुविधा दिली आहे. याचा व्यापार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. ‘एफओआयएस’ सॉफ्टवेअरच्या मदतीने मालगाड्यांचा मागोवा घेता येतो. याद्वारे तुम्ही मालगाडीतून येणारे तुमचे उत्पादन किती अंतरावर पोहोचले आहे, हे जाणून घेऊ शकता.
डिजिटलायझेशनच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. ‘एफओआयएस’ सॉफ्टवेअरवर ‘ई-डिमांड’ आणि ‘ईटीआरआर’ सुविधाही उपलब्ध आहेत. याद्वारे व्यापार्‍यांना घरी बसून रेल्वेच्या पावत्या डिजिटल पद्धतीने मिळू शकणार आहेत. ऑनलाईन पेमेंटची सुविधाही 24 तास उपलब्ध असणार आहे.