गडचिरोली : चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षली ठार

गडचिरोली : चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षली ठार

गडचिरोली ; Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिसांचा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांचा कट उधळून लावत सी- ६० पथकाच्या जवानांनी आज सोमवारी (दि. १३) रोजी चोख प्रत्युत्तर देत तीन नक्षल्यांना कंठस्नान घातले. मृतांमध्ये पेरिमिली दलमचा प्रभारी व नक्षल्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.
पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगलात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी विशेष अभियानचे अप्पर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांच्या दोन तुकड्या नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना केल्या. पोलिस त्या परिसरात शोध मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, सी-६० जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. पेरिमिली दलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडर वासू याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर दोन महिला नक्षल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी तीन स्वयंचलित शस्त्रे, एक एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास असे साहित्य व नक्षल साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त केले असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
हेही वाचा 

धुळे : भर उन्हात महानगरपालिकेकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी, शिवसेना महानगरप्रमुखांकडून निषेध
UP Crime: उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेते, पत्रकार आशुतोष श्रीवास्त यांची गोळ्या झाडून हत्या
नागपूर : जोरदार वादळी पाऊस; जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू