माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

गडचिरोली ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा काँग्रेसमध्ये पैसेवाल्यांनाच उमेदवारी दिली जाते, असा गंभीर आरोप करीत माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या ‘ना’राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने प्रदेश महासचिव डॉ.नामदेव  किरसान यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी गडचिरोलीचे माजी आमदार आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी हेही इच्छूक होते. त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने डॉ.किरसान यांच्यावर विश्वास टाकला. यामुळे आपण आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्याकडे पाठविल्याचे डॉ.उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ३ लाख मते घेतली. पुढे २०१९ च्या निवडणुकीत त्याहीपेक्षा जास्त मते मिळवली. त्यामुळे आपण याही निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने माझ्यासारख्या स्थानिकाला उमेदवारी न देता गोंदिया जिल्ह्यातील डॉ.किरसान यांना उमेदवारी दिली. किरसान हे पैसेवाले आहेत. ते जिल्ह्याचे प्रभारी होते. एक-दोन वर्षांपासून ते येथे काम करीत आहेत. असे असताना त्यांना उमेदवारी दिल्याने आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ.उसेंडी यांनी सांगितले. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षाने डॉ.किरसान यांना बदलून आपणास उमेदवारी दिली तर आपला सन्मान होईल, असेही ते म्हणाले. सध्यातरी आपणास कोणत्याही अन्य पक्षाची उमेदवारीची ऑफर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, काँग्रेसच्या रोजगार व स्वंयरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ भडके, अविनाश चलाख उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका

डॉ.उसेंडी यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली. सीडब्लूसीच्या बैठकीत चंद्रपूरहून प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोली-चिमूरमधून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. परंतु पुढे एका नेत्याने धानोरकर यांच्या नावाला विरोध करुन दुसरे नाव पुढे केले. नंतर ते नाव मागे घेतले आणि स्वत:ही निवडणूक लढण्यास नकार दिला. अशावेळी या नेत्याने माझ्या नावासाठी आग्रह करणे अपेक्षित होते. परंतु तसे केले नाही, असे सांगून डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हेही वाचा : 

Vishwajit Patil: भाजप ऐनवेळी सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी देणार?, विश्वजित कदम म्हणाले…

खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

ब्रेकिंग | के. कविता यांना दिलासा नाहीच, ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Latest Marathi News माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.