आठ किलोमीटर खोलवर डायव्हिंग!

आठ किलोमीटर खोलवर डायव्हिंग!

एडिनबर्ग : स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे राहणार्‍या दोन तरुणींनी आजवर कोणालाच जमले नाही, असा पराक्रम करून दाखवला आहे. या दोघींनी दक्षिण प्रशांत महासागरात बाकुनावा पाणबुडीवरून उडी मारली आणि पाण्याखाली चक्क 8 किलोमीटर खोलवर गेल्या. ही खोली जवळपास माऊंट एव्हरेस्टच्या उंचीइतकी आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची 9,000 मीटरपर्यंत मोजली गेली आहे. या दोन्ही तरुणींचा पराक्रम पाहून अवघे जग थक्क झाले असून, जगभर त्यांची चर्चा सुरू आहे.
400 मैल लांब आणि 8,000 मीटर खोल असलेल्या समुद्राच्या क्षेत्राला नोव्हा-कँटन ट्रफ म्हणतात. याला फ्रॅक्चर झोन असेही ओळखले जाते. या दोन्ही महिला सामोआमध्ये राहतात. तिथून या ठिकाणी पोहोचायला चार दिवस लागतात. दोघीही सुमारे 10 तास इतक्या खोलवर समुद्रात होत्या. अखेर दुर्मीळ विक्रम त्यांच्या नावावर झाला. प्रोफेसर स्टीवर्ट 2001 पासून सागरी भूवैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा समुद्रात डुबकी मारली होती. त्यानंतर आतापर्यंत 5 वेळा त्या समुद्रात गेल्या आहेत. याआधी त्या 6000 मीटरपर्यंत खोल गेल्या होत्या.
प्रोफेसर स्टीवर्ट याबाबत बोलताना सांगतात की, ही एक आश्चर्यकारक संधी होती. आम्ही जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टच्या पातळीपर्यंत खाली जात होतो. आम्ही खरोखरच जागतिक विक्रम मोडणार आहोत, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्या दिवसापर्यंत मला ते कळलेच नाही. आम्ही उतरत असताना केट म्हणाली, मला वाटते, एवढ्या खोलवर महिला उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि नेमके तेच झाले. एक नवा विश्वविक्रम आम्ही आमच्या खात्यावर केला.