शरद पवारांसाठी काँग्रेसचे रेड कार्पेट

शरद पवारांसाठी काँग्रेसचे रेड कार्पेट

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसमधून फुटून बाहेर निघालेल्यांना सामावून घेण्याची आमची तयारी आहे. ज्या पक्षांना परत यायचे आहे, त्यांच्यासाठी आम्ही पायघड्या (रेड कार्पेट) घालून तयार आहोत. विचार एकच असतील तर वेगवेगळे पक्ष कशाला, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शरद पवार यांच्या विलीनीकरणाच्या विधानाला प्रतिसाद दिला; तर देशातील हवा बदलली असून 4 जूनला भाजपचे सरकार सत्तेबाहेर जाणार, असा दावाही थरूर यांनी केला.
* काँग्रेसमधून फुटून बाहेर निघालेल्यांना सामावून घेण्याची आमची तयारी                                                                            * काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शरद पवार यांच्या विलीनीकरणाच्या विधानाला प्रतिसाद                                                        * विचार एकच असतील तर वेगवेगळे पक्ष कशाला?
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईत डेरेदाखल झालेल्या थरूर यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विचार सारखेच असल्याने भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान शरद पवारांनी अलीकडेच केले होते. यासंदर्भात विचारले असता, परत येऊ इच्छिणार्‍या पक्षांच्या स्वागतासाठी आम्ही पायघड्या घालू, असे थरूर म्हणाले.
यंदाची लोकसभा निवडणूक ही भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा संघर्ष आहे. केवळ दक्षिण भारतच नाही तर देशभरातील हवा बदलली आहे. 4 जूनला निकाल लागेल तेव्हा भाजप सत्तेबाहेर गेलेले असेल आणि देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा थरूर यांनी यावेळी केला.
प्रचारात भारतीय जनता पक्ष बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांचे प्रश्न यांच्यावर बोलत नाही. जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून इतर मुद्द्यांवरच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. पण मोदींनी ते स्वीकारले नाही , असे थरूर म्हणाले.