महायुतीत बंडखोरी: हिंगोलीमधून भाजपचे रामदास पाटील यांचा अर्ज

महायुतीत बंडखोरी: हिंगोलीमधून भाजपचे रामदास पाटील यांचा अर्ज

हिंगोली : Bharat Live News Media वृत्तसेवा :  महायुतीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा एकनाथ शिंदे गटाकडे आहे. त्यानुसार शिंदे गटाकडून बाबुराव कदम यांचे नाव निश्चित झालेले असताना भाजपचे नेते रामदास पाटील यांनी आज (दि.४)  आपला  अपक्ष  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे   निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Hingoli Lok Sabha
हिंगोली लोकसभेची जागा भाजपकडे राहावी, याकरिता भाजपच्या वतीने लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक दृष्टिकोनातून मोठे काम करण्यात आले होते. लोकसभा मतदारसंघातील भाजपची परिस्थिती पाहता ही जागा भाजपकडेच राहील, अशी शक्यता बळावली होती. भाजपमध्ये रामदास पाटील यांच्यासह शिवाजी माने, रामराव वडकुते, गजानन घुगे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे यांची नावे चर्चेत होती.  Hingoli Lok Sabha
त्यातल्या त्यात रामदास पाटील यांनी गेल्या साडेतीन-चार वर्षांमध्ये लोकसभा मतदारसंघ पिंजून काढीत आपणच लोकसभेचे प्रबळ दावेदार असल्याची ओळख निर्माण केली होती. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे येईल, या संदर्भात तर्कवितर्क सुरू होते. असे असताना शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडेच राहील, हे स्पष्ट झाले होते. परंतु भाजपने घेतलेल्या बैठकीमध्ये हेमंत पाटील यांना तीव्र विरोध व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर केली.
बाबुराव कदम हे सक्षम उमेदवार ठरू शकत नाहीत, अशी भावना आजही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आज रामदास पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटील हे या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुमठाणकरांनी आपला अर्ज कायम ठेवून निवडणूक रिंगणात उतरल्यास या निवडणुकीला वेगळाच रंग प्राप्त होऊ शकतो. ज्यामध्ये अष्टीकरांना थेट लढत देण्याची ताकद केवळ रामदास पाटील यांच्यामध्ये आहे, अशी भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
सुरुवातीला जागा शिंदे गटाकडे जाहीर झाल्यानंतर भाजपमधून कोणीही बंडखोरी करणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती ज्याला रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या माध्यमातून छेद दिला आहे. येणाऱ्या काळात  पाटील आपला अर्ज कायम ठेवतात की, मागे घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे रामदास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उघडपणे सामील झाले होते. तर काही अपक्ष नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा 

Lok Sabha Election : हिंगोली : लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी बारा उमेदवारांकडून सोळा अर्ज दाखल
हिंगोली लोकसभा : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द; शिंदे सेनेकडून बदली उमेदवार जाहीर; कोहळीकरांना तिकीट
हिंगोली : कार-दुचाकी अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू

Latest Marathi News महायुतीत बंडखोरी: हिंगोलीमधून भाजपचे रामदास पाटील यांचा अर्ज Brought to You By : Bharat Live News Media.