कोल्हापुरात दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून

कोल्हापुरात दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून अमानुषपणे खून केल्याची घटना राजारामपुरी येथे (गल्ली क्रमांक सात) रविवारी (दि.१२) पहाटे घडली. दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) असे खून झालेल्या तरुणाचे  नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित संगमेश अशोक तेंडुलकर (वय ५४ रा. कोटणीस हाइट्स, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर) यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती दिनेश सोळांकूरकर व संशयित संगमेश तेंडुलकर हे दोघे जिवलग मित्र होते. काही वर्षांपूर्वी दिनेश हा गारगोटी येथे वास्तव्याला गेला. मात्र, अधूनमधून त्यांची भेट होत असे. दोघेही काम धंदा करत नव्हते, रिकामटेकडेच होते. दिनेश तीन दिवसांपूर्वी संशयित तेंडुलकरच्या राजारामपुरी येथील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने रात्री दोघेही मद्य प्राशन करत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांच्या मध्ये जोर जोरात वादावादी झाली.
दिनेश याने संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तेंडुलकर यांनी दिनेशला पाठीमागून मिठी मारून जोरात गळा आवळला. दिनेश मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला सोडून दिले. दोन तास संशयित मृतदेहाजवळ बसून होता. पहाटे सहा वाजता संशयिताने पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून या  घटनेची माहिती दिली.
शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. राजारामपुरी येथील मध्यवस्तीत खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत दिनेश याची आई सुजाता अशोक सोळांकूरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपीने खुनाची कबुली दिली असल्याचे  तपासाधिकारी अनिल तनपुरे यांनी सांगितले.
हेही वाचा

कोल्हापूर : खासगी सावकारीतून नागावच्या तरुणास बेदम मारहाण
कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वळवाचा तडाखा : सहा जखमी
कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या युवकाचा कासारी धरणात बुडून मृत्यू