रेबिजने शेतकरी महिलेचा मृत्यू

रेबिजने शेतकरी महिलेचा मृत्यू

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वैद्यकीय उपचारात झालेला हलगर्जीपणा चंदगड तालुक्यातील 38 वर्षीय शेतकरी महिलेच्या जीवावर बेतला. रेणुका शंकर बागडी (वय 38, रा. बेळेभाट, ता. चंदगड) यांचा कुत्रे चावल्यानंतर 20 व्या दिवशी म्हणजे गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
रेणुका या 19 एप्रिल रोजी सायंकाळी घरासमोरील अंगणात कुटुंबीयांसमवेत गप्पा मारत बसलेल्या असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. डोळ्याजवळ चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना रात्री चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमेवर उपचार करून रेबिज इंजेक्शन दिले. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी त्याच रात्री साडेआठला रेणुका यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील डॉक्टरांनी दुसर्‍या दिवशी सकाळी कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये जाऊन दाखल होण्याची सूचना केली.
या घटनेमुळे बांगडी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रेणुका यांचे दीर शिवाजी बागडी यांनी वेळीच वैद्यकीय उपचार योग्यपणे झाले असते तर ही घटना टळली असती, अशा भावना व्यक्त केल्या. रेणुका बांगडी मूळच्या कर्नाटकातील बेळगाव येथील. 2001 मध्ये शेतकरी कुटुंबातील शंकर बागडी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 2015 मध्ये त्यांच्या पतीचे अकाली निधन झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला होता.
नातेवाईकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष
वास्तविक चावा घेतलेले कुत्रे पिसाळलेले असल्याने खबरदारी म्हणून रुग्णाला दोन-तीन दिवस सीपीआरमध्ये निगराणीखाली ठेवण्याची गरज होती. तशी नातेवाईकांनी उपचार करणार्‍या डॉक्टरांकडे विनंतीही केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णाला न्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही काळाने रेणुका यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे पुन्हा गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घरी जाण्याचा सल्ला
रेणुका यांना 20 एप्रिल रोजी दुपारी 11.30 वाजता सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रेबिजचे दोन डोस घेतले आहे का, अशी विचारणा केली. नातेवाईकांनी होकार देताच त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला कुटुंबीयांना देण्यात आला. त्यानंतर रुग्णाला घेऊन कुटुंबीय सायंकाळी गावी परतले.
रेबिजमुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष!
दोन दिवसांपासून रेणुका यांची प्रकृती खालावली. गुरुवारी रात्री गंभीर अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. रेबिजमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकार्‍यांनी अहवालात नमूद केला आहे.