बंडखोरीचा वणवा पेटला!; महायुती, मविआलाही नाराजांची डोकेदुखी

बंडखोरीचा वणवा पेटला!; महायुती, मविआलाही नाराजांची डोकेदुखी

दिलीप सपाटे

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असताना जसे जसे जागा वाटप जाहीर होऊ लागले आहे, तसतसा बंडखोरी आणि नाराजांचा वणवा पेटू लागला आहे. महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट हे तीन प्रमुख पक्ष असले, तरी दोन्हीकडे जागा वाटपावरून धुसफुस सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नसताना या नाराजांचा चेतलेला वणवा थंड करताना प्रमुख नेत्यांची दमछाक सुरू आहे. ( Lok Sabha Election 2024 )
महायुतीत उमेदवारीवरून आठ ते दहा ठिकाणी नाराजी भडकली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात गेल्यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठणाचे फळ मिळाले असून, त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात विस्तव जात नाही. रवी राणा यांनी कडू यांच्यावर टीका करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून खोके घेतल्याचा आरोप केला होता. हा आरोप बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागला होता. आता कडू या आरोपाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. तर राणा यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहेच. शिवाय अजित पवार यांच्या सोबत असलेले संजय खोडके आणि शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे देखील राणा यांना मदत करण्याची शक्यता दिसत नसल्याने अमरावती मतदार संघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांचे शिलेदार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. ते प्रचारालाही लागले होते. मात्र, जागावाटप जसे जवळ आले, तशी राष्ट्रवादीने उचल खाल्ली. या मतदार संघातून आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हेमंत गोडसे हे नाराज झाले असून, त्यांनी हा निर्णय बदलावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि मुंबईच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. मंत्री दादा भुसे हा मतदारसंघ शिवसैनिककडेच राहावा म्हणून हेमंत गोडसे यांच्या जोडीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, भुजबळ यांना हा मतदारसंघ सुटेल, असे सध्याचे चित्र आहे. अशावेळी जर हेमंत गोडसे यांनी बंडखोरी केली किंवा शिवसेनेची नाराजी दूर झाली नाही, तर भुजबळ यांना ही निवडणूक सोपी राहणार नाही.
रायगड मतदार संघात पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली असली, तरी एकाच वेळी शिवसेना आणि भाजप तटकरे यांच्या उमेदवारीवरून नाराजी आहे. तटकरे हे खासदार असतानाच त्यांची कन्या आदिती तटकरे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे सर्व पदे ही एकाच कुटुंबात दिली जात असल्याने तटकरे यांच्या विरोधात नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे स्थानिक आमदार रवीशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जुन्या निष्ठावंत पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत तटकरे यांचे काम करण्याचे आदेश दिले. मात्र, अंतर्गत नाराजी अद्याप पूर्णतः मिटलेली नाही. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे आधीपासूनच तटकरे यांच्या विरोधात आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी ते किती मदत करतात, याबाबतही शंका आहे. त्यामुळे गेल्यावेळी रायगडमधून काठावर निवडून आलेल्या तटकरेंची चिंता वाढली आहे.
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असले, तरी बीडमधून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांची नाराजी काही संपलेली नाही. त्यांनी भाजप उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे. शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली, तर त्या लोकसभा निवडणुकीत उतरतील, हे स्पष्ट आहे. त्या जर निवडणूक रिंगणात उतरल्या तर मराठा आणि वंजारी मताचे ध्रुवीकरण अटळ आहे. हे ध्रुवीकरण पंकजा मुंडे यांना संघर्ष करायला भाग पाडू शकते.
हिंगोली मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाली असली, तरी भाजपने या जागेवर दावा केला होता. आपला दावा फोल ठरल्याने स्थानिक भाजप आमदार आणि अन्य पदाधिकारी यांची नाराजी अद्यापही मिटलेली नाही. ही नाराजी मिटली नाही तर हेमंत पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांनी राजीनामा देत शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. नीलेश लंके यांच्या उमेदवाराने ही लढत राज्यासाठी लक्षवेधी ठरली आहे. अजित पवार यांनी लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लंके सुजय विखेंच्या विरोधात लढण्यावर ठाम राहिल्याने अजित पवार यांचा एक आमदार घटला असून, सुजय विखे यांचा सोपा पेपर आता अवघड झाला आहे. जळगावच्या रावेर मतदार संघातून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली असली, तरी पक्षात आणि पक्षाबाहेरही त्यांच्या विरोधातील नाराजी उफाळून आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच भाजपच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांनी त्यांच्याविषयी आपली नाराजी बोलून दाखवली.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेले असले, तरी त्यांच्या सुनेला म्हणजे रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने गिरीश महाजन नाराज आहेत. तुम्ही आमच्या खासदार असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे का करता? असा आक्षेप भाजप पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. तर एकनाथ खडसे यांचे विरोधक समजले जाणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसे यांच्या विरोधात नाराजीचा सूर लावला आहे. अशावेळी स्वपक्षातील आणि बाहेरील पदाधिकार्‍यांची समजूत काढता काढता रक्षा खडसे या हैराण झाल्या आहेत. माढा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांना उमेदवारी दिली असताना त्यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आघाडी उघडली आहे.
महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल नाही. कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसच्या तिकिटावर सोडण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघ आपल्याकडे घेत तेथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले स्व. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील युवानेते विशाल पाटील यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतविभाजन अटळ आहे.
दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईतही काँग्रेस निवडणूक लढण्यास इच्छुक असताना तेथे उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेषतः दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस जास्त आग्रही होती. पण उद्धव ठाकरे यांनी तेथे माजी खासदार अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी महायुती आणि महाविकास आघाडी कशी दूर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ( Lok Sabha Election 2024 )
Latest Marathi News बंडखोरीचा वणवा पेटला!; महायुती, मविआलाही नाराजांची डोकेदुखी Brought to You By : Bharat Live News Media.