मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे पडणार महागात!

मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे पडणार महागात!

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईतील रस्त्यावर थुंकणार्‍या अथवा कचरा टाकणार्‍यांना आता सावध राहावे लागणार आहे. कारण अशा लोकांवर महापालिकेचे क्लीनअप मार्शल नजर ठेवणार असून, अशी कृत्ये करणार्‍यांकडून जागेवरच ऑनलाईन दंड वसूल केला जाणार आहे.
मुंबईतील प्रत्येक पालिका वॉर्डात आता 30 क्लीनअप मार्शल तैनात ठेवण्यात येणार असून, मंगळवारी (दि. 2) प्रायोगिक तत्वावर पालिकेच्या ए वॉर्डातून याची सुरूवात झाली. बुधवारी सी वॉर्डात हे मार्शल फिरणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डात सुमारे 720 मार्शल विविध ठिकाणी कार्यरत राहून शहर गलिच्छ करणार्‍यांकडून दंड वसूल करतील. मात्र, ही दंडात्मक कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने होईल. यासाठी क्लिन अप मार्शल संस्थेने प्रत्येक विभागात प्रशिक्षित क्लिन अप मार्शलची नेमणूक केली आहे.
तर दंड वसुलीसाठी महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाईन अ‍ॅपद्वारे दंडात्मक कारवाईची यंत्रणा तयार केली आहे. कारवाईसाठी क्लिन अप मार्शलकडे मोबाईल, ब्लू टूथवर चालणारा छोटा प्रिंटरही असेल. या प्रिंटरद्वारे दंडाची स्वतंत्र पावती छापून दिली जाईल. इतर कोणत्याही छापील पावतीचा वापर केला जाणार नाही. दंडाची रक्कम क्लिन अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यात जमा होणार असून, त्यामुळे रोख पैशांची हाताळणी होणार नाही.
किमान 100 रुपये दंड
या कारवाईत दंडाची रक्कम कमीत कमी 100 तर जास्तीत जास्त 1 हजार रुपये असेल. मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होण्याचा विश्वास ही ऑनलाईन दंडात्मक पद्धती राबविण्याची संकल्पना असलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे व्यक्त केला आहे.
Latest Marathi News मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे पडणार महागात! Brought to You By : Bharat Live News Media.