Lok Sabha election : वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार?

Lok Sabha election : वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार?

सतीश सरीकर

कोल्हापूर : महाविकास आघाडीकडून (Lok Sabha election) शाहू महाराज यांची उमेदवारी काही दिवसापूर्वीच जाहीर झाली. मात्र त्यांच्याविरूद्द महायुतीकडून कोण? याबाबत संभ्रमावस्था होती. अखेर शिवसेनेकडून विद्यमान खा. संजय मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याने शाहू महाराज आणि खा. मंडलिक यांच्यातच मैदान होणार असल्याने साहजिकच हाय होल्टेज लढत होईल. या लढतीला आता १५ वर्षापूर्वीच्या निवडणूकीचा संदर्भ आला आहे. त्यामुळे वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२००९ सालात झालेल्या लोकसभा निवडणूकीत विद्यमान खा. संजय मंडलिक यांचे वडिल दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे एकमेकांविरूध्द रणांगणात उतरले होते. त्यावेळी अपक्ष असुनही सदाशिवराव मंडलिक यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांना पराभवाचा झटका दिला होता. ती निवडणूक मंडलिक विरूध्द संभाजीराजे अशी असली तरी खरी लढत मंडलिक विरूध्द शरद पवार अशी गाजली. कारण शरद पवार यांनी म्हातारा बैल म्हणून सदाशिवराव मंडलिक यांच्यावर टीका केली होता. परिणामी राज्यात या लढतीची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे आता त्याच सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक आणि संभाजीराजे यांचे वडिल शाहू महाराज एकमेकांविरूध्द मैदानात उतरले आहेत. त्यामुळे वडिल शाहू महाराज हे आपले पुत्र संभाजीराजे यांच्या २००९ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवाचा बदला घेणार की संजय मंडलिक हे आपले वडिल सदाशिवराव मंडलिक यांच्या यशाची परंपरा राखणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha election)
उमेदवारी जाहीर झाल्यापासून शाहू महाराज यांचे संपूर्ण कुटुंबिय प्रचारात उतरले आहे. माजी खा. संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे यांच्यासह स्नुषा संयोगिताराजे व मधुरीमाराजे आदींचा समावेश आहे. स्वतः शाहू महाराज दररोज किमान ८ ते १० गावांचा दौरा करून भेटीगाठीवर भर देत आहेत. काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्यासह इतर आमदार त्यांच्या साथीला आहेत. त्या तुलनेत खा. मंडलिकसुध्दा प्रचारात उतरले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खा. धनंजय महाडीक आदीसह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट खा. मंडलिक यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहे.
देशात आणि राज्यात कुणाचीही लाट असली तरी कोल्हापूर त्याला अपवाद असते हा इतिहास आहे. कोल्हापूरकर मतदार कुणाला निवडणूक आणायचे यापेक्षा कुणाला पाडायचे यासाठीच मतदान करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा असते. शाहू महाराज पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. जनतेबरोबरच विरोधी उमेदवारांतही त्यांच्याविषयी आदर आहे. परिणामी टीकेला नक्कीच मर्यादा येणार आहेत. परंतू विरोधकांकडून उमेदवारांऐवजी महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत असल्याचा मुद्दा प्रचारात आणला जात आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी राज्य आणि देशपातळीवर नेतेमंडळींच्या मुलूखमैदानी तोफाही कोल्हापूरात बरसतील.
बदललेल्या राजकीय समीकरणाचा कुणाला फायदा? (Lok Sabha election)
२०१९ मधील लोकसभा निवडणूकीत संजय मंडलिक व धनंजय महाडीक एकमेकांविरूध्द लढले होते. त्यावेळी मंडलिक हे शिवसेने तर महाडीक राष्ट्रवादीचे उमेदवार होते. महाडीक यांचे कट्टर विरोधक आ. सतेज पाटील व आ. हसन मुश्रीफ यांची मंडलिक यांना साथ होती. त्यामुळे तत्कालीन विद्यमान खा. महाडीक यांचा मंडलिक यांनी तब्बल पावणेतीन लाख मतांनी नामुष्कीजनक पराभव केला होता. परंतू आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. सतेज पाटील महाविकास आघाडीत आहेत. तर खा. मंडलिक महायुतीचे उमेदवार आहेत. साहजिकच गेल्यावेळी निवडूण आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेल्या खा. मंडलिक यांच्या पराभवासाठी सतेज पाटील रात्रंदिवस फिरत आहेत. गेल्यावेळी ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला त्या खा. मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे खा. महाडीक यांच्यावर अ‍वलंबून आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्या जोडीला असतील. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणाचा कुणाला फायदा होणार? हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होईल.
गेल्या तीन लोकसभा निवडणूकीतील मतदान…
२००९ :
सदाशिवराव मंडलिक – ४,२८,०८२
संभाजीराजे – ३,८३,२८२
२०१४ :
धनंजय महाडीक – ६,०७,६६५
संजय मंडलिक – ५,७४,४०६
२०१९ :
संजय मंडलिक – ७४९०८५
धनंजय महाडीक – ४,७४,५१७
Latest Marathi News Lok Sabha election : वडील बदला घेणार की मुलगा यशाची परंपरा राखणार? Brought to You By : Bharat Live News Media.