करवीरमध्ये गटांचे वर्चस्व; पण ताकद महाविकास आघाडीकडे

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघ हा नेत्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व नेत्यांचे या मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात गट आहेत. तीन तालुक्यांत हा मतदारसंघ विभागाला असून, या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद रोखताना विरोधकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांतील 275 गावांचा समावेश आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील 102, पन्हाळा तालुक्यातील 68 … The post करवीरमध्ये गटांचे वर्चस्व; पण ताकद महाविकास आघाडीकडे appeared first on पुढारी.

करवीरमध्ये गटांचे वर्चस्व; पण ताकद महाविकास आघाडीकडे

विकास कांबळे

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघ हा नेत्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व नेत्यांचे या मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात गट आहेत. तीन तालुक्यांत हा मतदारसंघ विभागाला असून, या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद रोखताना विरोधकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यांतील 275 गावांचा समावेश आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील 102, पन्हाळा तालुक्यातील 68 व गगनबावडा तालुक्यातील 44 गावांचा समावेश आहे. करवीर विधानसभा मतदारसंघाचे सध्या काँग्रेसचे आ. पी. एन. पाटील प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, शिक्षक आमदार आ. जयंत आसगावकर, शेकापचे संपतराव पवार, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील हे सर्व महाविकास आघाडीकडे आहेत. या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांचीदेखील ताकद आहे. त्यामध्ये महाडिक गट, आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, पी. जी. शिंदे यांचा समावेश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचादेखील गट आहे; परंतु अद्याप त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही.
करवीर विधानसभा मतदारसंघावर पूर्वी शेकापचे वर्चस्व होते. नंतर या मतदारसंघावर काँग्रेसने आपला झेंडा लावला. आ. पी. एन. पाटील यांनी शेकापकडून मतदारसंघ काढून घेतला. त्यानंतर काँग्रेसचे आ. पी. एन. पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके असा सामना या मतदारसंघात रंगू लागला. यामध्ये पाटील यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले; परंतु गेल्या 2019 च्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांचा आ. पाटील यांनी पराभव केला. या निवडणुकीत मात्र नरके यांना फारशी कोणाची साथ मिळाली नाही. कुंभी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारी गावे हीच नरके यांच्या जमेची बाजू आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर झाले. जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्यातील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले सर्व विद्यमान खासदार, आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील माजी आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागरदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे असल्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने नरके यांच्यावरच असणार आहे.
आ. पी. एन. पाटील यांचे या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहेच; परंतु आ. सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात या मतदारसंघातून केली असल्यामुळे त्यांचाही या तालुक्यात गट आहे. करवीरप्रमाणेच आ. सतेज पाटील यांचा गगनबावडा तालुक्यातही प्रभाव आहे. या तालुक्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगले जाळे निर्माण केले आहे. काँग्रेसचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर हेदेखील या मतदारसंघातीलच आहेत. महायुतीचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे यांचा पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे. या तालुक्यातील 68 गावे करवीरमध्ये आहेत. गगनबावडा तालुक्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा काही गावांत प्रभाव आहे. कुंभी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावांमध्ये माजी आ. चंद्रदीप नरके यांचे चांगले संबंध आहेत. यावरून या विधानसभा मतदारसंघात सर्व नेत्यांचा आपापल्या भागात प्रभाव दिसून येतो. असे असले तरी महाविकास आघाडीतील नेते पाहिल्यानंतर लोकसभेसाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीला रोखण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना कंबर कसावी लागणार आहे.

Latest Marathi News करवीरमध्ये गटांचे वर्चस्व; पण ताकद महाविकास आघाडीकडे Brought to You By : Bharat Live News Media.