कोल्हापूर : नियोजनात अडकला नद्यांतील गाळ

कोल्हापूर : नियोजनात अडकला नद्यांतील गाळ

सुनील सकटे

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूर परिस्थितीस जबाबदार अनेक घटकांपैकी एक घटक म्हणजे नद्यांतील गाळ. दहा ते बारा वर्षे नद्यांतील गाळ काढलेला नाही. पंचगंगेत तब्बल साडेपाच लाख घनमीटर गाळ असल्याचे समोर आले आहे. हा गाळ काढण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून केवळ नियोजन सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला तरी गाळ काढला नसल्याने जिल्ह्यातील नद्यांतील गाळ नियोजनात अडकल्याचे चित्र आहे.
पाटबंधारे विभागाचे गाळ काढण्याचे नियोजन कागदावर आहे. गाळ साठवून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. महसूल विभागाने जागा निश्चित केल्यानंतर खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे; मात्र सध्या महसूल विभाग लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे, तर पाटबंधारे विभाग आता महसूल वसुलीतून मोकळा झाला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी गाळ काढण्याच्या नियोजनाचा पत्ताच नाही.
पंचगंगा नदीच्या शिवाजी पूल, राजाराम बंधारा, शिये पूल, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे. या सर्व ठिकाणी गाळ साचला आहे. गेल्या काही वर्षांत कोल्हापूरला महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नद्यातील गाळ हे एक महापुराचे कारण असूनही प्रशासकीय पातळीवर फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.
पंचगंगा व भोगावतीच्या पाडळी खुर्द ते रुकडी 15 कि. मी.मध्ये 5 लाख 79 हजार घ. मी. गाळ. वारणा नदीत निलेवाडी-पारगाव आणि चावरे 5 कि. मी. मध्ये 20 हजार घ. मी. गाळ. कडवीच्या मलकापूर परिसरात 3 कि.मी.मध्ये 10 हजार घ.मी. गाळ. कासारीच्या काटे ते करंजफेण 5 कि. मी. मध्ये 37 हजार घ.मी. गाळ आहे. जांभळीच्या किसरुळ परिसरात 2 कि. मी. मध्ये 30 हजार घ. मी. गाळ. हिरण्यकेशीच्या गिजवणे बंधारा ते गडहिंग्लज स्मशानभूमी 3 कि. मी.मध्ये 4 लाख 20 हजार घ. मी. गाळ. ताम—पर्णीच्या निटूर-कोवाड ते कालकुंद्री 6 कि. मी. मध्ये 8 लाख 40 हजार घ. मी. गाळ. घटप्रभाच्या सावतवाडी ते हदलगे 4 कि.मी. मध्ये 56 हजार घ.मी. गाळ आहे. वेदगंगाच्या शेणगाव, म्हसवे, खानापूर-निढोरी ते बानगे या 10 कि.मी.मध्ये 5 लाख 65 हजार 549 घ.मी. गाळ.
Latest Marathi News कोल्हापूर : नियोजनात अडकला नद्यांतील गाळ Brought to You By : Bharat Live News Media.