राज्यातील ९ लाख ८३ हजार ६५१ विद्यार्थी अद्याप ‘आधार’विनाच

राज्यातील ९ लाख ८३ हजार ६५१ विद्यार्थी अद्याप ‘आधार’विनाच

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या यू-डायस प्रणालीत शाळा, विद्यार्थी, शिक्षक आदी माहिती अपूर्ण असताना विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून ते वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील तब्बल 4 लाख 28 हजार 814 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आहेत; तर 5 लाख 54 हजार 837 विद्यार्थ्यांची शाळेकडे उपलब्ध असलेली माहिती व आधारवरील माहिती यात विसंगती आहेत. 9 लाख 83 हजार 651 विद्यार्थी आधार क्रमांकविनाच असल्याचे सरलवरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांची माहिती सरल आणि यू-डायस प्लस प्रणालीच्या माध्यमातून दरवर्षी एकत्र केली जाते.
सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधांची माहिती तसेच आधार कार्ड अपडेट करणे तसेच प्रमाणीकरण करून घेणे आदी कामे शाळांना दिली जातात. या विद्यार्थी संख्येवरच समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध योजना तसेच केंद्र व राज्य सरकाकडून निधी पुरवला जातो. वर्ष संपत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी नसल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विविध योजनावर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शाळांतील शैक्षणिक वर्ष संपत असून आता परीक्षा हंगाम सुरू आहे. जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रांरभ होईल. मात्र वर्षभरात अद्याप नऊ लाख विद्यार्थ्यांचा आधारचा घोळ कायम आहे. यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या गणवेश, शिष्यवृत्ती अशा विविध योजनांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाने ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध आहेत असे विद्यार्थी नियमित शाळेत येतात का, याची तपासणी करून आधार नोंदणीत येत असलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची सूचना दिली आहे. आधार नसल्यामुळे कोणत्याही सुविधा विद्यार्थ्यांना डावलल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अवैध असल्याची कारणे काय आहेत, याची तपासणी करून आधार मिळवून देण्याकरता प्रयत्न करण्यात येणार आहेत.
असा आहे गोंधळ
विद्यार्थ्यांचे नाव, निवासाचा पत्ता, लिंग याबाबत शाळेतील नोंदी आणि आधार कार्डावरील नोंदी यात तफावत असल्याने अनेकांचे आधार कार्ड अवैध ठरले आहे. यामुळे नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळांना अडचणी येत आहेत.
अशी आहे आकडेवारी…
विद्यार्थी संख्या : 2 कोटी 12 लाख 55 हजार 896
आधार कार्ड असलेले विद्यार्थी : 2 कोटी 8 लाख 51 हजार 263
आधार कार्डची माहिती अपूर्ण असलेले विद्यार्थी : 4 लाख 4 हजार 633
आधार कार्ड पडताळणी सुरू असलेले : 2 कोटी 2 लाख 96 हजार 426
आधार कार्ड वैध विद्यार्थी : 1 कोटी 98 लाख 67 हजार 612
आधार कार्ड अवैध विद्यार्थी : 4 लाख 28 हजार 814
सरलवरील डाटा, आधारवरील माहितीत विसंगती : 5 लाख 54 हजार 837
Latest Marathi News राज्यातील ९ लाख ८३ हजार ६५१ विद्यार्थी अद्याप ‘आधार’विनाच Brought to You By : Bharat Live News Media.