Pune Traffic | वारजे चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ!

पुणे : ’त्यांना’ चौकातील सिग्नलचा रंग हिरवा आहे की लाल, हे दिसत नाही… रस्ता ओलांडणारे पादचारी दिसत नाहीत… चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस दिसत नाहीत… फक्त जोरजोरात हॉर्न वाजवत, वाहन ’उडवत’ बेदरकारपणे कोणत्याही बाजूने कसेही वेगात निघून जायचे, एवढेच कळते! कारण, वारजे चौकातील निम्मे वाहनचालक ’आंधळे’ झाले आहेत. वारजे माळवाडीच्या चौकात पुलाच्या खाली वाहने कशी …

Pune Traffic | वारजे चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ’त्यांना’ चौकातील सिग्नलचा रंग हिरवा आहे की लाल, हे दिसत नाही… रस्ता ओलांडणारे पादचारी दिसत नाहीत… चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस दिसत नाहीत… फक्त जोरजोरात हॉर्न वाजवत, वाहन ’उडवत’ बेदरकारपणे कोणत्याही बाजूने कसेही वेगात निघून जायचे, एवढेच कळते! कारण, वारजे चौकातील निम्मे वाहनचालक ’आंधळे’ झाले आहेत.
वारजे माळवाडीच्या चौकात पुलाच्या खाली वाहने कशी चालवू नयेत आणि अपघात कसे होऊ शकतात, याचा ‘आँखों देखा हाल’ दररोज पाहायला मिळतो. सकाळी नऊ ते अकरा या वेळेत आणि संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये वाहतूक कोंडीचा आणि वाहनचालकांच्या बेदरकार वृत्तीचा तमाशा पाहायला मिळतो. त्यामुळे सिग्नल पाहून रस्ता ओलांडू पाहणारे पादचारी आणि वाहतुकीचे नियम पाळणारे वाहनचालक अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.
वारजे माळवाडीत पुलाखाली असलेल्या चौकातून कर्वेनगरकडून शिवणे, उत्तमनगरकडे जाणारे आणि तिथून येणारे, चांदणी चौकाकडून वडगावकडे जाणारे आणि येणारे, पॉप्युलरनगरकडून येणारे आणि जाणारे असे पाच-सहा रस्ते एकत्र येतात. मुंबई-बंगळुरू महामार्गाचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) ही येथूनच जातात. त्यामुळे येथे वाहनांची कायम गर्दी असते.
सहाआसनी रिक्षाचालकांकडून नियम पायदळी
शिवणे, उत्तमनगरकडून येणारे सिक्स सिटरचालक सर्व नियम पायदळी तुडवत मुख्य चौकात येऊन ‘यू टर्न’ घेऊन जातात. त्यांना कोणत्या बाजूचा सिग्नल सुटला आहे, कोणत्या बाजूचा बंद आहे, याच्याशी काहीही देणेघेणे नसते. दादागिरी करत वाहन पुढे दामटवायचे आणि तंबाखू-गुटख्याच्या पिचकार्‍या मारत, शिव्यांची लाखोली वाहत निघून जायचे, हे चित्र नित्याचेच झाले आहे.
पाहणीत काय आढळले?
ऐन चौकातच वाहतूक पोलिस चौकी असूनही पोलिसांचे जीवघेण्या गर्दीवर ताबा नसल्याचे दिसून येत आहे.
वारजे माळवाडी चौकाला लागूनच मजूरअड्डे आहेत. त्यामुळे रविवारी सकाळी येथे वाहने जास्त की माणसे, अशी स्पर्धाच लागलेली असते.
सर्वच बाजूंनी सिग्नल तोडत येणार्‍या आणि वेगाने निघून जाणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.
रस्ता ओलांडायचा असेल तर स्वत:च्या जोखमीवर ओलांडायचा, तुम्हाला कोणीही वाट करून देणार नाही, हे नक्की
या उपाययोजना कराव्यात
सिग्नल तोडणार्‍यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी.
पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे टाळण्यासाठी रस्त्याचे लेव्हलिंग आवश्यक.
कात्रजकडे जाणार्‍या खासगी रिक्षाचालकांना, हातगाडीवाल्यांना चौकात उभे राहण्यास मनाई करावी.
मी दररोज संध्याकाळी 6.30 ते 7 च्यादरम्यान ऑफिसवरून घरी जाताना वारजे पुलाखालील चौकातून जातो. बहुतांश वाहनचालक नियम मोडत असल्याने चौक क्रॉस करण्यासाठी किमान अर्धा तास वेळ जातो. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
– प्रदीप कुलकर्णी
रस्ता ओलांडताना सिक्स सिटर कुठून, कधी आणि कशा अंगावर येतील याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे बसमधून उतरून रस्ता ओलांडताना खूप भीती वाटते. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या बातम्या वारंवार ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे चौक ओलांडून घरी जाईपर्यंत मनात धाकधूक असते.
– स्नेहल बनसोडे
वारजे चौकामध्ये ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी खूप उशीर होतो. तासनतास चौकात थांबून राहायला लागते. कारण बाजूला सिक्स सीटरचा त्रास असतो. डावीकडे वळणार्‍या गाड्यांची खूप गर्दी असते. बस स्टॉपजवळ आला असल्यामुळे त्या चौकामध्ये खूपगर्दी होते. रस्त्याच्या बाजूला ड्रेनेजचे काम संथ गतीने सुरु आहे. ड्रेनेज तुंबून राहण्याने सगळे पाणी वर येते व त्याचा घाण वास सर्वत्र पसरलेला असतो. दुसर्‍या गाड्यांमुळे पाणी बरेचदा अंगावर उडते आणि ऑफिसला जाऊन ड्रेस बदलावा लागतो. चौकातील कोंडीचे लवकरात लवकर नियोजन करावे, अशी नम्र विनंती.
– एक त्रासलेला प्रवासी

हेही वाचा

अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक
Nashik Crime Update : समाजाविरोधात आक्षेपार्ह पत्रकाचे वाटप; दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको
दिल्लीच्या तापमानाने बनवला बेसनच्या लाडूंचा हलवा!