अरुणाचलवरील दाव्यानंतर भारताने चीनला ठणकावले!

अरुणाचलवरील दाव्यानंतर भारताने चीनला ठणकावले!

सुरत, वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशसह येथील ठिकाणांची नावे चीनने बदलल्याने हा भाग चीनचा होऊन जाणार नाही. आजचा भारत हा 1962 चा भारत नाही. हे चीनने लक्षात घ्यावे. याउपर काही आगळीक सीमेपलीकडून झालीच तर त्याला सडेतोड उत्तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय जवान देतील, अशा थेट शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला फटकारले. चीनने अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलल्यानंतर भारताने ही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
एखाद्या घराचे नाव कुणी परस्पर बदलले, घरावरील नेमप्लेट परस्पर बदलली म्हणून ते घर त्याचे होईल काय, असा थेट सवाल करून अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.
चीनने नावे बदलल्याने काही फरक पडणार नाही. अरुणाचलमधील ठिकाणांची अशाप्रकारे नावे बदलण्याचा पोरखेळ यापूर्वीही चीनने अनेकदा केलेला आहे, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा पुन्हा एकदा केला आणि या राज्यासह राज्यातील नद्या, डोंगर आदी 30 ठिकाणांचे नामकरण चिनी भाषेतून केले. चीनच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना जयशंकर यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले.
सुरतमध्ये आयोजित कॉर्पोरेट समिट 2024 दरम्यान विविध प्रश्नांना जयशंकर यांनी उत्तरे दिली. अरुणाचल व लडाखसंदर्भातील चीनच्या दाव्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयशंकर पुढे म्हणाले, आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसीवर) तैनात आहे. कोणत्या परिस्थितीला कसे उत्तर द्यायचे, ते त्यांना माहीत आहे. चीनने आगळीक केली तर उत्तर मिळेल. आजचा भारत 1962 चा भारत नाही. कुणीही भ्रमात राहू नये. (1962 च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता)
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 30 ठिकाणांची नावे बदलली
सोमवारी अरुणाचलमधील 11 रहिवासी भाग, 12 टेकड्या, 4 नद्या, एक तलाव आणि डोंगरांतून निघणार्‍या एका मार्गाचेही नावे बदलल्याचे जाहीर केले होते. नवी नावे चिनी, तिबेटी आणि रोमन भाषेतून प्रसिद्धही करण्यात आली. गेल्या सात वर्षांत चीनने अरुणाचलमधील ठिकाणांची नावे बदलण्याची ही चौथी वेळ आहे, हे येथे उल्लेखनीय!
चीनने ठेवली म्हणून नावे बदलतील का?
* नामांतरासाठी वैश्विक पातळीवर काही निश्चित नियम आणि प्रक्रिया आहेत.
* एखाद्या देशाला एखाद्या ठिकाणाचे नाव बदलायचे असेल तर त्याला संयुक्त राष्ट्रे जागतिक भौगोलिक माहिती व्यवस्थापन विभागाला त्याची माहिती आधी द्यावी लागते.
* नंतर संयुक्त राष्ट्राचे भौगोलिक तज्ज्ञ या भागाला भेट देतात. नंतरच नावातील बदल मंजूर होतो आणि नोंदवला जातो.
* अमेरिकेसह बहुतांश देशांनी अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केलेले आहे.
The post अरुणाचलवरील दाव्यानंतर भारताने चीनला ठणकावले! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source