सहकार आयुक्तपदी शैलेश कोतमिरे

सहकार आयुक्तपदी शैलेश कोतमिरे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या सहकार आयुक्तपदी सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी व अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे. सहकार आयुक्त हे पद महत्त्वाचे असल्याने ते रिक्त ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील नियमित अधिकारी उपलब्ध होईपर्यंतच्या कालावधीसाठी कोतमिरे यांच्याकडे सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश सहकारचे सहसचिव सं. पु. खोरगडे यांनी जारी केले आहेत.
शासनाने सहकार आयुक्तपदी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली केली होती. मात्र, ते रुजू न झाल्यामुळे सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार मध्यंतरी साखर आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे दिला होता. कवडे हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने सहकार आयुक्तपद रिकामे झाले. तो पदभार कोतमिरे यांनी सोमवारी (दि.1) स्वीकारला. तर साखर आयुक्तपदाचा पदभार कृणाल खेमनार यांनीही स्वीकारला आहे.
कोतमिरे हे सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांची सहकार विभागात उपनिबंधकपदी खात्यात प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर सोलापूर आणि पुणे जिल्हा उपनिबंधक म्हणून काम केले. विभागीय सह निबंधक म्हणून पदोन्नती झाली. या दरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून काम केले. या दोन्ही बँका आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास कोतमिरे यांना यश आले आहे.
हेही वाचा

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबत पुणे विद्यापीठाचा सामंजस्य करार..
पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद; शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होणार
Lok Sabha Election 2024 : गोविंदा पुन्हा राजकीय आखाड्यात

Latest Marathi News सहकार आयुक्तपदी शैलेश कोतमिरे Brought to You By : Bharat Live News Media.