कोल्हापूर : शिवसेनेला साथ की काँग्रेसला हात?

कोल्हापूर : शिवसेनेला साथ की काँग्रेसला हात?

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहरी मतदारांची साथ नेमकी कुणाला, हा औत्सुक्याचा विषय आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातात आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. आ. सतेज पाटील काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. मतदारसंघाचे नेतृत्व आ. जयश्री जाधव करत आहेत. 2022 मधील पोटनिवडणुकीत भाजपनेही लक्षवेधी मते घेतली. भाजपची धुरा खा. धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर आहे. या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेला साथ देणार की काँग्रेसला हात देणार, याबाबत औत्सुक्य आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील व खा. महाडिक हे कट्टर विरोधक आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी या समविचारी पक्षांची आघाडी असूनही आ. पाटील यांनी महाडिक यांच्याविरोधात प्रचाराचे रान उठवले. ‘आमचं ठरलयं’ ही टॅग लाईन वापरून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला; मात्र यंदाच्या निवडणुकीत त्याच मंडलिकांच्या विरोधात आमदार पाटील यांनी दंड थोपटले आहेत, तर मंडलिकांकडून पराभव झालेल्या खा. महाडिक यांना यंदाच्या निवडणुकीत मंडलिकांच्या प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. मंडलिकांच्या प्रचारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफसुद्धा मैदानात उतरले आहेत.
कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला. मतदारसंघ स्थापन झाल्यापासून अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे तत्कालीन आ. सुरेश साळोखे यांचा 2004 मध्ये पराभव करून मालोजीराजे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला; परंतु 2009 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांना पराभूत करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला. 2014 मध्येही त्यांनी विजयी परंपरा राखली. 2019 मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला; परंतु त्यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विजयासाठी क्षीरसागर यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले. याच निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा उमेदवार उभा करून 78 हजार मते मिळविली.
शाहू महाराज यांच्यासाठी आ. पाटील यांच्यासह आ. जयश्री जाधव आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरले आहेत. खा. संजय मंडलिक यांच्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ, क्षीरसागर, खा. महाडिक आदींसह महायुती रणांगणात आहे. वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोप यावर बंधने आली असली तरी मतदानाची तारीख जवळ येईल तशी प्रचाराला धार येईल. लोकसभेला कोणीही उमेदवार असला तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने नेहमीच शिवसेनेला बळ दिले आहे. आता भाजपनेही मतदारसंघात पाय रोवले आहेत, तर सध्या काँग्रेसच्या ताब्यात मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक बालेकिल्ल्याला अपवाद ठरणार की मतदार जुनीच परंपरा कायम राखणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
2014 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून मिळालेली मते
संजय मंडलिक (शिवसेना) 86,396
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) 82,511
2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून मिळालेली मते
संजय मंडलिक (शिवसेना) 1,01,892
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) 74,237
Latest Marathi News कोल्हापूर : शिवसेनेला साथ की काँग्रेसला हात? Brought to You By : Bharat Live News Media.