आरोग्य प्रमाणपत्रासाठी भावी नोकरदारांची फरपट; तरुणांमध्ये नाराजी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि नियुक्तिपत्र देण्यात आलेल्या उमेदवारांना तसेच पोलिस व सैन्यदलात भरती झालेल्या उमेदवारांना सरकारी रुग्णालयातून शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र आणणे आवश्यक असते. मात्र, ससून रुग्णालयात आल्यावर योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने उमेदवारांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विविध तपासण्यांसाठी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये पाठवताना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवारांना रक्त, लघवी, कान, डोळे, सोनोग्राफी, मानसिक स्थिती आदी तपासण्या कराव्या लागतात. ससूनच्या वेगवेगळ्या इमारतींमध्ये तपासण्यांचे कक्ष आहेत. तपासणीसाठी फॉर्म भरल्यानंतर त्यांना एका कागदाच्या चिठ्ठीवर कोणत्या ओपीडीमध्ये जायचे, ते क्रमांक लिहून दिले जातात. मात्र, कोणती तपासणी कोठे करायची, याबाबत मदत केली जात नाही. त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक मदत कक्ष सुरू करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केली आहे. ससून प्रशासनाला याबाबत पत्र देण्यात आले आहे.
तपासण्या करण्यासाठी केवळ कक्षांचे नंबर लिहून दिले जातात. कोणता कक्ष कोठे आहे, याची माहिती नसते. कक्षात तपासणीसाठी गेल्यास काही डॉक्टरांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे संबंधित कक्षांवर सूचना देणारे फलक लावावेत. माहितीपत्रक उमेदवारांना देण्यात यावे. दहा दिवसांत ही व्यवस्था करावी अथवा आंदोलन करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.
आरोग्य तपासणीसाठी येणार्या उमेदवारांना तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना योग्य माहिती देण्यासाठी संबंधित कक्षावर माहिती फलक लावण्यात येतील. त्यामुळे त्यांची धावपळ कमी होऊ शकेल.
– डॉ. अजय तावरे, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.
हेही वाचा
‘नेट’चे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर..
एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर?
महा-स्वयं पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाईन शिक्षण!
Latest Marathi News आरोग्य प्रमाणपत्रासाठी भावी नोकरदारांची फरपट; तरुणांमध्ये नाराजी Brought to You By : Bharat Live News Media.