१७ लाखांचे सोने लांबविणाऱ्या बंगाली कारागीराला अखेर अटक

१७ लाखांचे सोने लांबविणाऱ्या बंगाली कारागीराला अखेर अटक

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – बंगाली सुवर्ण कारागीर हा दोन सराफ व्यापाऱ्यांचे तब्बल १७ लाख रुपयांचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पसार होता. शनिपेठ पोलिसांनी तुमसर रेल्वेस्थानक येथून रविवारी (दि. ३१) रोजी सकाळी ११ वाजता त्याला अटक केली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सराफ बाजारातील दोन सराफा व्यापाऱ्यांचे तब्बल १७ लाख रुपयांचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन बंगाली कारागिर शेख अमीरुल हुसेन (वय-२८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु. जोशी पेठ, जळगाव) हा पसार झाला होता. मुंबई-हावडा मेलने पश्चिम बंगाल येथे जात असताना तुमसर रोड स्थानकावर आरपीएफच्या पथकासह शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि चंद्रकांत धनके, पोकॉ रवी तायडे यांनी 31 मार्च रोजी संशयितास ताब्यात घेतले.
हिशोब चुकता करण्याआधीच आला जाळ्यात
आरोपी शेख याची शनिपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, सराफ व्यावसायिकांनी सोने दिल्यानंतर त्याचे दागिने घडवून परत देत असताना त्यात थोडी-थोडी घट येत होती. मात्र सराफ व्यावसायिकांना पूर्ण सोने द्यावे लागते, त्यामुळे दुसऱ्या सराफ व्यावसायिकाकडून दागिने घडवण्यासाठी घेतलेले सोने पहिल्या व्यावसायिकाला देत होता. दुसऱ्या सराफ व्यावसायिकाची भर काढण्यासाठी तिसऱ्याचे सोने त्याला द्यावे लागत असे. असे करता-करता कर्जाचे ओझे वाढत गेले. त्यामुळे आता ज्यांना-ज्यांना सोने द्यायचे आहे, त्यांना ते देण्यासाठी हाती आलेल्या २५६ ग्रॅम सोन्यातून हिशोब चुकता करण्याचे शेख याने ठरवले. त्यानुसार त्याने १५८.१२ ग्रॅम सोने वेगवेगळ्या जणांना देऊन उर्वरित ९७.८८० ग्रॅम सोने घेऊन तो गावाकडे निघाला होता. गावी जाऊन उर्वरित सोने विकून संबंधित सराफाला पैसे पाठवू आणि उर्वरित रकमेसाठी वेळ मागून घेऊन, असे त्याने ठरवले. मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
शेख हा जळगावात आठ वर्षांपासून सुवर्ण कारागिर म्हणून काम करत आहे. हे काम करता-करता तो पत्ते, जुगारही खेळू लागला व त्या नादातून त्याच्यावर कर्ज वाढत गेल्याचे काही सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र तपासात तसे समोर आलेले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :

स्वातंत्र्यानंतर सिद्धटेकला प्रथमच पोस्ट! नागरिकांत आनंदाचे वातावरण
उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय : आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला
मोदींच्या करारी बाण्याची आता अमेरिकेलाही धास्ती

Latest Marathi News १७ लाखांचे सोने लांबविणाऱ्या बंगाली कारागीराला अखेर अटक Brought to You By : Bharat Live News Media.