भुदरगड तहसीलदार कार्यालयाची देखणी इमारत होणार, प्रेरणास्थळाचीही उभारणी
रविराज वि. पाटील
गारगोटी: मागील कित्येक वर्ष उभारणीच्या प्रतीक्षेत असलेली भुदरगड तहसील कार्यालयाची हायटेक आणि अद्यावत इमारत होणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रेरणास्थळाची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील वैभवात मोठी भर पडणार आहे.
भुदरगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसिलदार कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल १५ कोटी ५६ लाखांचा निधी आमदार आबिटकर यांनी मंजूर केला आहे. तहसीलदार कार्यालयाची देखणी आणि हायटेक अशी इमारत उभारण्यात येणार आहे. याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी गोळीबार झालेल्या ठिकाणची दगडी वास्तू तशीच ठेवली जाणार आहे. तसेच स्वतंत्र प्रेरणास्थळाची उभारणीही केली जाणार आहे.
खिडकीतून केलेल्या गोळीबारात स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य
गारगोटी येथील मुख्य चौकात ब्रिटिश कालीन तहसिल इमारत आहे. या इमारतीला लागून पोलीस ठाण्याचीही इमारत आहे. तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या दगडी खोलीतील खजिना लुटण्याचा बेत स्वातंत्र्य सैनिकांनी आखला होता. मात्र इंग्रजी पोलिसांनी खिडकीतून केलेल्या गोळीबारात स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य आले. यावेळी याठिकाणी असलेल्या खजिन्याचे ठिकाण किंवा ज्या खिडकीतून गोळीबार झाला. या बाबतची माहिती जुन्या जाणत्या लोकांना विचारल्याशिवाय मिळत नाही. स्वातंत्र्य वीरांच्या या स्मृती जपण्यासाठी तसेच लोकांना या ऐतिहासिक लढ्याची माहिती मिळण्यासाठी ऐतिहासिक गोळीबार खजिना स्ट्राॅंगरूमला धक्का न लावता, स्वतंत्र अस्तित्व ठेवून प्रेरणास्थळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रेरणा स्थळामध्ये कूर पुल उडविण्यासाठी आखलेला बेत, पालीची गुहा व स्वातंत्र्य लढ्यातील गोळीबार घटनेचा माहिती पट उलगडण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पर्यटकांना गारगोटीतील स्वातंत्र्य लढ्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत म्हणजे गैरसोयीचे आगारच
तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत म्हणजे गैरसोयीचे आगारच आहे. या इमारतीमधील खोल्या अरूंद आहेत. म्हणावा तितका प्रकाश मिळत नसून अंधुक वातावरण आहे. पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना तसेच कामासाठी येणा-या नागरिकांना सुलभ शौचालयाची सुविधा नाही. पोलिसांना कैद्यांच्या कोठडीतील शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. महिला पोलिसांची तर मोठी गैरसोयच आहे. येणाऱ्या लोकांना साधे पिण्याचे पाणी सुध्दा मिळत नाही. वाहन पार्किंगचीही मोठी गैरसोय आहे. सभोवताली कचरा, सांडपाणी यामुळे नेहमीच दुर्गंधी सुटत असून नागरिकांना नाकाला रूमाल लावून नोंदणी कार्यालयाडे जावे लागते. या कार्यातील आजतागायत फरशी देखील बदलेली नाही, अशी या इमारतीची अवस्था आहे.
रेकार्ड विभाग, वन विभाग, ट्रेझरी, पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, पुरवठा विभाग, रजिस्ट्रार विभाग अशी आठ ते दहा कार्यालये दाटी वाटीने वसलेली होती. पोलीस स्टेशन वगळता ही सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत.
स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामात येथे सात हुतात्मे झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सात पाकळ्यासह मशाल घेतलेले स्मारक उभारले गेले. पण कचेरीत झालेला गोळीबाराचा ऐतिहासिक इतिहास लोकांना समजतच नाही. सध्याच्या ऐतिहासिक गोळीबार खजीना वास्तुला धक्का न लावता तहसीलदार कार्यालय उभारणी, छत्रपतीं शिवाजी महाजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व हुतात्मा चौकाचेही सुशोभीकरण करून गारगोटीतील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वांना समजेल, यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे.
स्वातंत्र्य लढ्यावेळी ब्रिटिश पोलिसांनी स्वातंत्र्यवीरांवर केलेल्या गोळीबारात सात जणांना हौतात्म्य आले. तहसीलदार कार्यालयातील गोळीबाराचे ठिकाण हे त्याची साक्ष आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी लोकभावनेचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा आदर ठेवून खजिन्याची स्वतंत्र दगडी वास्तू ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा माहिती पट समाजासमोर येण्यासाठी स्वतंत्र संग्रहालय उभे करावे. हुतात्म्यांच्या स्मरणात उभारलेल्या सर्व हुतात्मा स्मारकाची सध्याची अवस्था पाहता त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी लागेल.
– मधुकर देसाई (म्हसवे), संचालक, बिद्री कारखाना
हेही वाचा
Kolhapur News : कोल्हापूर : मादळेत भीषण पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी वणवण
कोल्हापूर : हजगोळी येथील वृद्धाची गळा चिरून हत्या; मृतदेह नदीत आढळला
कोल्हापूर : गणेशमूर्ती खाली आणताना लिफ्टची रोपवे वायर तुटली; कामगार ठार, एक जण जखमी
Latest Marathi News भुदरगड तहसीलदार कार्यालयाची देखणी इमारत होणार, प्रेरणास्थळाचीही उभारणी Brought to You By : Bharat Live News Media.