चालणारा दुर्मीळ गुलाबी मासा कॅमेर्‍यात कैद

चालणारा दुर्मीळ गुलाबी मासा कॅमेर्‍यात कैद

लंडन : टास्मानियाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात 19 व्या शतकातील जहाजाचे अवशेष आहेत. तिथे स्कुबा डायव्हिंग करीत असलेल्या लोकांना दुर्मीळ असा गुलाबी हँडफिश आढळून आला. हा मासा या अवशेषांजवळून समुद्रतळाशी चालत होता. त्याचा व्हिडीओ बनवण्यात या लोकांना यश आले.
या माशाचे वैज्ञानिक नाव ‘ब्राचिओप्सिलस डाएंथस’ असे आहे. सामान्य भाषेत त्याला ‘हँडफिश’ किंवा ‘हाताने चालणारा मासा’ असे संबोधले जाते. हा मासा जहाजाच्या अवशेषांजवळ असलेल्या प्रवाळ खडकांमागे लपलेला होता. त्याच्या हातासारख्या दिसणार्‍या पेक्टोरल फिन्सना फैलावून तो चालू लागला. या प्रजातीचा शोध 1947 मध्ये लावण्यात आला. त्यावेळेपासून असे मोजकेच मासे दिसून आले आहेत.
आता हा मासा काही संशोधक स्कुबा डायव्हर्सना दिसला. ते ‘एसएस टास्मान’ या डच जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रात उतरले होते. मात्र, या अवशेषांऐवजी हँडफिशनेच त्यांचे लक्ष वेधून घेतले! ‘एसएस टास्मान’ हे जहाज 1873 मध्ये बांधण्यात आले होते. त्याचा वापर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अशा दोन्हींसाठी होत असे. टास्मानियाच्या मुख्य भूमीपासून दहा किलोमीटर अंतरावर समुद्रात त्याचे अवशेष आहेत. एका प्रवाळ खडकाला धडकून हे जहाज बुडाले होते. त्यावेळी 29 प्रवासी व कर्मचार्‍यांनी आपला जीव वाचवला होता, तर 75 जणांना जलसमाधी मिळाली होती. जहाज बुडाल्याच्या घटनेला 140 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही मोहीम आखण्यात आली होती.
Latest Marathi News चालणारा दुर्मीळ गुलाबी मासा कॅमेर्‍यात कैद Brought to You By : Bharat Live News Media.