१४०० वर्षांपूर्वीच्या ‘डीएनए’वरून बनवला चिनी राजाचा चेहरा

१४०० वर्षांपूर्वीच्या ‘डीएनए’वरून बनवला चिनी राजाचा चेहरा

बीजिंग : प्राचीन काळातील काही व्यक्तींचा चेहरा कसा दिसत असावा याचा अंदाज त्यांचे कॉम्प्युटर मॉडेल तयार करून बनवला जात असतो. त्यासाठी त्यांच्या चेहर्‍याच्या अवशेषांचा किंवा डीएनएचाही वापर केला जातो. आता चौदाशे वर्षांपूर्वीच्या एका चिनी राजाच्या अशाच डीएनएचा वापर करून हा राजा कसा दिसत होता याचे एक चित्र बनवण्यात आले आहे. सहाव्या शतकात चीनवर राज्य करणार्‍या सम्राट वू याच्या मकबर्‍याचा 1996 मध्ये शोध लावण्यात आला होता. त्यावेळी गोळा केलेल्या ‘डीएनए’वरून हे संशोधन करण्यात आले आहे.
सम्राट वू याने इसवी सन 580 च्या दरम्यान राज्य केले होते. उत्तर झोउ राजवंशाच्या या सम्राटाला प्राचीन चीनच्या उत्तर भागाला एकजूट करण्याचे श्रेय दिले जाते. त्याच्या मकबर्‍याचा 1996 मध्ये शोध लागल्यावर तेथील जेनेटिक मटेरियलवर झालेल्या अभ्यासाची माहिती आता ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी ‘डीएनए’च्या आधारे सम्राट वू याचा चेहरा बनवला आहे. शिवाय त्याचे आरोग्य, शरीराची ठेवण आणि पूर्वजांबाबतची माहितीही शोधली आहे. त्याच्या डीएनएमधील जीनोम सिक्वेन्स अनालिसिसमधून हे समजते की त्याचे डोळे करडे व केस काळे होते. त्याचा रंग थोडा सावळा होता.
सहाव्या शतकातील या राजाचा संबंध भटक्या जियानबेई समुदायाशी होता. हे लोक जिथे राहत होते तिथे सध्याचा मंगोलिया आहे. चीनच्या उत्तर आणि ईशान्य भागामध्येही हे लोक राहत होते. शांघायच्या फूडन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी ज्या अवशेषांचा अभ्यास केला त्यामध्ये राजाच्या कवटीचाही समावेश होता. तिच्या मदतीने त्यांनी राजाच्या चेहर्‍याचे अनुमान लावले. संशोधक शाओक्विंग वेन यांनी सांगितले की, सम्राट वू याचा वयाच्या 36 व्या वर्षी अचानक मृत्यू झाला होता. ऐतिहासिक नोंदींनुसार त्याचा मृत्यू विष दिल्याने झाला. मात्र, संशोधकांना त्याच्या अवशेषांच्या अभ्यासातून मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.
Latest Marathi News १४०० वर्षांपूर्वीच्या ‘डीएनए’वरून बनवला चिनी राजाचा चेहरा Brought to You By : Bharat Live News Media.