चौधरी चरण सिंह, एम. एस. स्वामिनाथन यांच्यासह ४ जणांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

चौधरी चरण सिंह, एम. एस. स्वामिनाथन यांच्यासह ४ जणांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्याहस्ते आज शनिवारी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला होता. चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत सिंह, पी. व्ही. नरसिंह राव यांचे सुपुत्र पी.व्ही. प्रभाकर राव आणि एम. एस. स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी तर कर्पूरी ठाकूर यांचे सुपुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (Bharat Ratna Awards)
या पुरस्कार सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य उपस्थित होते.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रविवारी भारतरत्नने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती मुर्मू लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भेट देतील आणि त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करतील. अडवाणी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारने यावर्षी ५ मान्यवरांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात मदन मोहन मालवीय, अटल बिहारी वाजपेयी, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. आता २०२४ मध्ये ५ जणांना भारतरत्न देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ५३ जणांना हा सन्मान मिळाला आहे.
बिहारमधील लोकांना आज मोठा आनंद- रामनाथ ठाकूर
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे कुटुंबीय आज राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार वितरणावेळी राष्ट्रपती भवनात हजर होते. त्यांचे पुत्र आणि जेडीयू नेते रामनाथ ठाकूर यांनी म्हटले आहे की, “बिहार आणि देशातील लोक आज माझ्याइतकेच आनंदी आहेत. नितीश कुमार यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासाठी भारत सरकारला सतत विनंती केली होती.”
”देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.” असे पीएम मोदी यांनी याआधी म्हटले होते. (Bharat Ratna Awards)
सामाजिक न्यायाचे प्रणेते जननायक कर्पुरी ठाकूर
सामाजिक न्याय संकल्पनेचे जननायक मानले जाणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा ‘भारतरत्न’ने (मरणोत्तर) सन्मान करण्यात आला. कर्पूरी ठाकूर हे बिहार काँग्रेसेतर पहिले मुख्यमंत्री होते. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि एकदा उपमुख्यमंत्री पद भूषवले होते. सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणूनही कर्पुरी ठाकूर यांना ओळखले जाते. त्यापार्श्वभूमीवर कर्पुरी ठाकूर यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) देण्यात असल्याची राष्ट्रपती कार्यालयाकडून औपचारिक घोषणा झाली. तर सामाजिक न्यायाचे दिग्गज आणि भारतीय राजकारणातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करत असल्याची घोषणा करताना भारत सरकारला गौरव वाटतो आहे, असे सरकारने निवेदनात म्हटले होते. हा प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे वंचित घटकांच्या उन्नतीसाठी जीवन समर्पण करणाऱ्या आणि सामाजिक न्यायासाठी आजीवन लढलेल्या कर्पूरी ठाकूर यांच्या अथक लढ्याला आदरांजली आहे. ‘जन नायक’ म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे, ठाकूर यांचा त्यांच्या वैयक्तिक आचरणातील साधेपणा अत्यंत प्रेरणादायी होता आणि भारतीय राजकारणात त्यांचे योगदान अमूल्य आहे, असेही सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
भारतीय शेतीचा कायापालट करणारे एम. एस. स्वामीनाथन
भारत सरकारने देशातील कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.” त्यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले. डॉ. स्वामिनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्नसुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.

#WATCH | Bharat Ratna award conferred upon former Bihar CM Karpoori Thakur by President Murmu at Rahstrapati Bhawan in Delhi
The award was received by his son Ram Nath Thakur pic.twitter.com/3vx5lkxwI2
— ANI (@ANI) March 30, 2024

हे ही वाचा :

मी ‘Tech.’ एक्सपर्ट नाही, पण माझ्यात ‘AI’बाबत मुलांसारखी उत्सुकता’- PM मोदी
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका! I-T ने बजावली १,७०० कोटींची नोटीस

 
 
Latest Marathi News चौधरी चरण सिंह, एम. एस. स्वामिनाथन यांच्यासह ४ जणांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान Brought to You By : Bharat Live News Media.