ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं

ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मी बाळासाहेबांच्या विचारांवर लढणारा शिवसैनिक आहे. मला कोणत्याही पक्षाची ऑफर नाही. मी शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडणार नाही. भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत, अशी भूमिका स्पष्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज (दि.३०) भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
अंबादास दानवे यांच्या ‘याचना नहीं अब रण होगा…’ या फेसबूक पोस्टनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाकडे तिकीट मागणं गुन्हा नाही. पण चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच नाराजी मिटली. माझं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचा मी महाराष्ट्रभर प्रचार करणार असून चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली आजही आम्ही काम करतो. त्यांचा प्रचारही आम्ही सुरू केला आहे, असे दानवे यांनी सांगितले.
ठाकरेंच्या सेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने ‘सामना’च्या माध्यमातून ही यादी जाहीर केली आहे.  चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात वाघाची डरकाळी आता घुमणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे. या स्टार प्रचारकांमध्ये सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.
याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी हे देखील प्रचारकांच्या यादीत आहेत. (Lok Sabha Election 2024 Maharashtra)
हेही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मतांसाठी भाजप अन् कामांसाठी काँग्रेस असे यापुढे चालणार नाही, मंडलिक यांना खडे बोल
कोकणात तीन मतदार संघांत लक्षवेधी लढती

Latest Marathi News ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं Brought to You By : Bharat Live News Media.