पत्नी, सासू, मेहुणा व मेहुणीच्या खूनप्रकरणी एकास फाशीची शिक्षा

पत्नी, सासू, मेहुणा व मेहुणीच्या खूनप्रकरणी एकास फाशीची शिक्षा

जयसिंगपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : यड्राव (ता. शिरोळ) येथे पत्नी रूपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती प्रदीप विश्वनाथ जगताप (वय 40, रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ, सध्या रा. शिरगावे मळा, पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे, यड्राव) याने पत्नीसह सासू, मेहुणी, मेहुणा या चौघांचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप जगताप यास मरेपर्यंत फाशी व 10 हजार रुपये दंड आणि दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्तमजुरी, अशी शिक्षा जयसिंगपूर येथील न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी मंगळवारी सुनावली. या खटल्यात 24 साक्षीदार तपासल्यानंतर चार व्यक्तींचा संशयातून खून ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
यड्राव येथे 6 ऑक्टोबर 2018 रोजी पत्नी रूपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रदीप जगताप याने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेहुणी सोनाली रावण, मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर यांना डोक्यात लाकडाच्या दांडक्याने मारून खून केला होता. शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी प्राथमिक तपास करून व त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. हारुगडे यांनी सखोल तपास करून जयसिंगपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांच्यासमोर चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी तपासले.
सरकार पक्षातर्फे साक्षीदार म्हणून पंच राहुल तात्यासो परीट, पंच वैशाली विजय पवार, पंच शाम जनार्दन कांबळे, पंच श्रीकांत कांबळे, पंच संतोष गौड, मुख्य फिर्यादी अभिषेक श्रीपती आयरेकर, वॉचमन गुंडुराव पिराजी भोसले, पोलिसपाटील जगदीश संकपाळ, निवेदन पंचनाम्यावरील दुसरे पंच सुनील माने, फिर्यादीचे भाऊ रुपेश आयरेकर, आरोपीचा मित्र राजू मारुती गायकवाड, आरोपीची सावत्र मुलगी बालसाक्षीदार सान्वी प्रदीप जगताप, घटनास्थळ पंच महादेव कांबळे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झुबेदा पठाण, पो. कॉ. अमित भोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महाडिक, पो. कॉ. गुरुनाथ चव्हाण, ताहितनकशा शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेरवाडे, डॉ. प्रभाकर पाटील, पो. हे. मारुती गवळी, प्रमाणपत्र देणारे विकास भुजबळ, पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील, एस. ए. हारुगडे यांच्या साक्षी घेण्यात आल्या. मंगळवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली.
मुलगीची साक्ष महत्त्वाची
बालसाक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सान्वी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने न्यायालयासमोर घडलेली घटना सांगितली. तिची साक्ष न्यायालयाने ग्राह्य मानली. आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यांवर मृतांचे रक्ताचे डाग होते. घटनेपूर्वी रात्री झालेल्या भांडणाबाबत अन्य साक्षीदारांनी साक्ष दिली. या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुरव यांनी आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप याला दि. 22 मार्च रोजी दोषी धरले होते. मंगळवारी शिक्षा सुनावण्यात आली.
Latest Marathi News पत्नी, सासू, मेहुणा व मेहुणीच्या खूनप्रकरणी एकास फाशीची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.