वाढत्या उन्हाने कलिंगडला अच्छे दिन

वाढत्या उन्हाने कलिंगडला अच्छे दिन

आवकेत वाढ, गावोगावी विक्री
बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यामुळे रसाळ फळांना मागणी वाढत आहे. विशेषत: कलिंगडची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हात कलिंगडला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. मात्र शेजारील महाराष्ट्र राज्यातूनच कलिंगडची आवक अधिक होत आहे. त्यामुळे स्थानिक कलिंगड विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. दरम्यान कलिंगड विक्रीसाठी शेतकऱ्याना घरोघरी फिरावे लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे पारा 36 अंशावर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाने शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत रसाळ फळांना आणि थंड पेयांना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: जिल्ह्यात 214 हेक्टर क्षेत्रात कलिंगडची लागवड झाली आहे. मात्र त्या प्रमाणात विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कलिंगड विक्री करावी लागत आहे. एक कलिंगड 15 ते 20 रुपयांप्रमाणे विकले जाते. आवक वाढल्याने दरही खाली आले आहेत. त्यामुळे निम्म्या दरात विक्री होऊ लागली आहे.
सद्यस्थितीत आकारमानानुसार 30 ते 80 रुपयांपर्यंत विक्री होऊ लागली आहे. यंदा पूरक हवामानामुळे कलिंगड उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: कागवाड, चिकोडी, अथणी, सौंदत्ती, निपाणी, हुक्केरी, खानापूर, गोकाक आदी तालुक्यांमध्ये उत्पादन होऊ लागले आहे. मात्र उत्पादनात वाढ झाल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यातच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कलिंगड विक्रीसाठी येऊ लागली आहेत. दरम्यान काहींना बाजारपेठेविना गावोगावी फिरुन विक्री करावी लागत आहे. विक्रेत्यांकडून कलिंगडांना कमी दर मिळत असल्याने शेतकरी स्वत: वाहनाव्दारे गावोगावी फिरुन विक्री करू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे कलिंगडची विक्री होऊ लागली आहे. इतर फळांच्या तुलनेत दर आवाक्यात असल्याने विक्रीही होवू लागली आहे. विशेषत: दुपारच्या वेळेत खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे.
जिल्ह्यात कलिंगड पिकाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका   लागवड क्षेत्र
अथणी       16
बैलहोंगल   5
बेळगाव    4
सौंदत्ती    37
चिकोडी 30
निपाणी   23
हुक्केरी   22
रामदुर्ग   5
खानापूर 10.8
रायबाग 14
गोकाक 48