रावेरमध्ये प्रतिष्ठेची लढत

रावेरमध्ये प्रतिष्ठेची लढत

मिलिंद सजगुरे

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या म्हणवल्या जाणार्‍या रावेर लोकसभा मतदार संघात खडसे विरुद्ध खडसे असे द्वंद्व होण्याची शक्यता धूसर झाली असली, तरी कुटुंबातील पक्षीय विभाजन नेमक्या कोणत्या स्तरापर्यंत जाते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण एकीकडे स्नुषा रक्षा खडसे यांच्या विजयी हॅट्ट्रिकचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी उमेदवारी टाळल्याचा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर स्वकीयांनीच आरोप केला असताना दुसरीकडे कुटुंबातील रोहिणी खडसे यांनी रक्षा यांना पराभूत करण्याचा उचललेला विडा इथल्या लढतीत वेगळा रंग भरणारा ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)
रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवार कोणीही असला तरी इथले राजकारण खडसे कुटुंबीयांभोवती फिरणे अपरिहार्य ठरते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने सलग तिसर्‍यांदा उमेदवारी बहाल केली आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेरमधून एकनाथ खडसे यांची उमेदवारी अप्रत्यक्षरीत्या जाहीर करून टाकली होती. स्वाभाविकच इथली लढत रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे अशी होण्याची अटकळ बांधली जात होती. तथापि, रक्षा यांची काहीशी अनिश्चित मानली जाणारी उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करून भाजपने एकनाथ खडसे यांची कोंडी करण्याची खेळी खेळली. खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मैदानात उतरणार नसल्याचे जाहीर केले. दुसरीकडे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी यांनी आपल्याला विधानसभा लढण्यात रस असल्याचे सांगत लोकसभेच्या रिंगणातून काढता पाय घेतला.
खडसे पिता-कन्येची भूमिका स्वपक्षातील अनेकांना खटकली. रक्षा यांचा मार्ग मोकळा करण्यासाठीच निवडणूक न लढण्याची सोयीची भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर जाहीर आरोप झाला. यावर सावरासावर करताना रोहिणी यांनी, वहिनी रक्षा यांची विचारधारा आमच्याहून वेगळी असल्याने त्यांना निवडणुकीत पराभूत केल्यावाचून राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. जिल्हा दूध संघ निवडणुकीत रक्षा यांनी मंदाकिनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे स्मरण करून देण्यासही रोहिणी कचरल्या नाहीत. अर्थात, राजकीय अंगाने सोयीची असलेली रोहिणी यांची ही विधाने वास्तवात उतरतात का, याबद्दल स्वकीयांच्या मनात शंका उपस्थित झाल्यास नवल वाटू नये. किमान, एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात भाजपला किती मतदान होते, यावरून विरोध ओठांपुरता होता की पोटापासून, ही बाब अधोरेखित होईल. (Lok Sabha Election 2024)
‘मविआ’कडून उमेदवाराची शोधाशोध…
दरम्यान, रावेरची जागा ‘मविआ’मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेला आली आहे. या मतदार संघात तीन दशकांपासून भाजपची मांड पक्की आहे. रक्षा यांच्याविरोधात खडसे पिता-कन्येपैकी कोणी मैदानात असते, तर यंदा मोठी चुरस पाहायला मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याव्यतिरिक्त तिसराच उमेदवार असल्याने तो नेमका कोण, याकडे लक्ष असणार आहे. यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील किंवा भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावांची चर्चा आहे. श्रेष्ठी नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.
Latest Marathi News रावेरमध्ये प्रतिष्ठेची लढत Brought to You By : Bharat Live News Media.