खर्गेंकडून हेलिकॉप्टर तपासणीचा आरोप

खर्गेंकडून हेलिकॉप्टर तपासणीचा आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. बिहारमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे प्रचारासाठी गेले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. समस्तीपूर येथे हा प्रकार घडला, अशी तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली आहे.  खर्गे यांनी रविवारी बिहारमध्ये समस्तीपूर आणि मुझ्झफरपूर येथे दोन जाहीर सभांमध्ये भाषणे केली. त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. हा पक्ष लोकशाही संपवायला निघाला असून विरोधी पक्षांची आघाडी लोकशाही वाचविण्यासाठी स्थापन झाली आहे, असा दावा त्यांनी या सभांमध्ये केला.
गांधीच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी
काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणीही करण्यात आली होती. आता खर्गेंचेही हेलिकॉप्टर तपासण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या मार्गांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून तो लोकशाहीला घातक ठरणारा आहे. हेलिकॉप्टर्सची तपासणी करण्याचा हा प्रकार इतर पक्षांच्या संबंधातही केला जातो का, याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश राठोड यांनी पत्रकारांसमोर केली.
खेड्यातील मतदारांचा असाही गैरसमज
जर मतदान केले नाही, तर आपल्याला मृत म्हणून घोषित केले जाईल, असा समज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील टाकेहर्ष या खेड्यातील नागरीकांचा झाला आहे. या मतदारसंघात आज मतदान होत आहे. हा गैरसमज कोणी करुन दिला यासंबंधी कोणीही स्पष्टपणे बोलत नाहीत. मात्र, या भीतीपोटी ते मतदान करणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. हे खेडे वारली, कातकरी आणि कोकनी जमातींचे असून नाशिक शहरापासून केवळ 46 किलोमीटरवर असूनही तेथे कोणतीही आधुनिक सुविधा नाही. अद्याप येथे वीज आलेली नसून रेशनही पुरेसे आणि वेळेवर मिळत नाही, असे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.