तेलंगणातील दुर्घटनेत कन्नड अभिनेत्रीचा मृत्यू

तेलंगणातील दुर्घटनेत कन्नड अभिनेत्रीचा मृत्यू

पवित्रा जयराम यांच्या कारचा अपघात : बहिणीसमवेत तीन जण गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ महबूबनगर
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी घडला आहे. तेलंगणातील महबूबनगर येथे झालेल्या या अपघातात पवित्रा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तिच्यासोबत कारमधून प्रवास करणारे तिची बहीण, चालक आणि एक अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पवित्रा जयराम यांना ‘तिलोत्तमा’ या टीव्ही मालिकेमुळे मोठी लोकप्रियता लाभली होती. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
महबूबनगर येथे चालकाने नियंत्रण गमाविल्यावर कार दुभाजकाला जाऊन आदळली होती. यानंतर हैदराबाद येथून वानापर्थीच्या दिशेने जाणारी बस कारच्या एका हिस्स्याला धडकली होती. या दुर्घटनेत पवित्रा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिची चुलत बहीण अपेक्षा, चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत गंभीर जखमी झाले आहेत.
पवित्रा जयराम आता आपल्यात नाही यावरच माझा विश्वास बसत नाही. माझी पहिली ऑन-स्क्रीन आई ठरलेल्या पवित्रा नेहमीच माझ्यासाठी खास राहतील असे उद्गार अभिनेता समीप आचार्यने काढले आहेत. पवित्रा या कन्नड तसेच तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तेलगू मालिका ‘त्रिनयानी’वरूनही त्या चर्चेत राहिल्या होत्या.