इस्रायलकडून अल जजीरा वाहिनीवर बंदी

इस्रायलकडून अल जजीरा वाहिनीवर बंदी

संसदेत कायदा संमत झाल्यावर उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी अल जजीरा वाहिनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेत एक कायदा संमत झाल्यावर अल जजीरा नेटवर्कवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कायदा सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या विदेशी वृत्तवाहिनीवर बंदी घालण्याचा अधिकार प्रदान करतो.
देशात कतार येथील वृत्तवाहिनीच्या कारवाया रोखण्यासाठी नव्या कायद्यानुसार त्वरित कारवाई करावी असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तर अल जजीराने नेतान्याहू यांच्या वक्तव्याची निंदा करत स्वत:चे साहसी वृत्तांकन सुरू ठेवणार असल्याचा दावा केला आहे. नेतान्याहू यांच्या सरकारने अल जजीरा यांच्या अभियानांविषयी अनेकदा तक्रार केली आहे. अल जजीरा ही वृत्तवाहिनी इस्रायलसंबंधी पूर्वग्रह बाळगून वृत्तांकन करत असल्याचा आरोप आहे. अल जजीरा ही  वाहिनी हमास या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे सांगणे आहे.
व्हाइट हाउसने इस्रायलच्या निर्णयासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका जगभरातील पत्रकारांच्या कार्याचे समर्थन करतो. यात गाझामध्ये वृत्तांकन करणारे लोकही सामील असल्याचे वक्तव्य व्हाइट हाउसचे प्रवक्ते कॅरिन जीन-पियरे यांनी केले आहे.