आक्रमक दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला आज श्रीलंकेशी

आक्रमक दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला आज श्रीलंकेशी

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टी-20 विश्वचषकातील पहिला मोठा सामना आज सोमवारी होणार असून त्यात गट ‘ड’मधील सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची गाठ श्रीलंकेशी पडेल. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजीवर नियंत्रण ठेवण्याकामी श्रीलंकेला त्यांच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीची किती मदत होते ते पाहावे लागेल. नेदरलँड्स, बांगलादेश व नेपाळसारखे काही धक्का देऊ शकणारे संघ गटात सामील असल्याने श्रीलंका लवकरात लवकर गुणतालिकेत प्रवेश करण्यास उत्सुक असेल.
कर्णधार एडन मार्करम, यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश असलेली दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोणत्याही गोलंदाजी आक्रमणासाठी एक भयानक दु:स्वप्न ठरू शकते. क्लासेन व स्टब्स हे गेल्या काही काळापासून आणि आयपीएलमध्येही जबरदस्त फॉर्ममध्ये राहिलेले आहेत. हे दोन्ही प्रतिभावान पॉवर-स्ट्रायकर्स मधल्या फळीत खेळतात म्हणजे फिरकीपटू कार्यरत असताना येतात. फिरकीविरुद्ध त्यांची, विशेषत: क्लासेनची कामगिरी प्रभावी राहिलेली आहे.
कर्णधार वानिंदू हसरंगा आणि महीश थीक्षाना यासारख्या लंकेच्या फिरकीपटूंना यामुळे नक्कीच चिंता वाटेल. या दोघांना अलीकडच्या काळात दुखापतींशी सामना करावा लागला होता. 2014 मधील विजेतेपदानंतर टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीत न पोहोचलेल्या श्रीलंकेला वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका यांच्याकडूनही चांगल्या माऱ्याची अपेक्षा असेल. किंग्स्टन येथे नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजविऊद्ध 0-3 ने पराभूत झालेली असल्यामुळे श्रीलंकेची आशा वाढलेली असेल.
न्यूयॉर्कची खेळपट्टी भारत आणि बांगलादेश यांच्यातील शनिवारच्या सराव सामन्याप्रमाणे गोलंदाजांना काही प्रमाणात मदत देत राहील, अशी आशा श्रीलंका बाळगून असेल. त्यांच्याकडे अनुभवी अँजेलो मॅथ्यूज, स्फोटक कुसल मेंडिस आणि धनंजया डी सिल्वा आहे तसेच माजी कर्णधार दासुन शनाका जलदगतीने धावा जोडू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यामध्ये फारसे वैविध्य नाही. ते मुख्यत्वे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि डावखुरा फिरकीपटू तबरेझ शम्सी यांच्यावर अवलंबून असून दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर एन्रिक नॉर्टजेला त्याची लय सापडू शकलेली नाही.
सामन्याची वेळ भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.