नवखे संघ स्पर्धेत चमत्कार घडवणार का?

नवखे संघ स्पर्धेत चमत्कार घडवणार का?

झटपट क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर सुऊवातीला वेस्टइंडीजने त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड या देशाने प्रभुत्व दाखवलं. त्या प्रत्येक वेळी नवखे संघ होते. कधी झिम्बाब्वे, श्रीलंका, नामीबिया तर कधी स्कॉटलंड ते कधी काल-परवाचा अफगाणिस्तान. जसं जमाना बदलला तसा नवख्या संघांचा खेळही उंचावत गेला. 1996 मध्ये श्रीलंकेने आक्रमकता दाखवली. 2007 मध्ये बांगलादेशने भारताला चांगलाच हिसका दाखवला. अलीकडे तर अफगाणिस्तानने प्रतिष्ठित संघेंच्या तोंडचे पाणी पळवले होते हेही विसरून चालता येणार नाही.
चालू विश्वचषक स्पर्धेत नवख्या संघांची खऱ्या अर्थाने खैरात आहे. टॉपचे आठ संघ त्यानंतर दोन यजमान संघ. (अमेरिका व विंडीज) उर्वरित संघ नेपाळमध्ये झालेल्या पात्रता फेरीतून पात्र झाले. ओमान, स्कॉटलंड, नामिबिया, पापुआ न्यू गिनी, युगांडा, नेपाळ, नेदरलँड्स हे सर्व संघ नवख्याच्या व्याख्येत  चपखल बसतात. (हे संघ म्हणजे स्पेशल शुद्ध शाकाहारी थाळीत दोन स्पेशल भाज्या, दोन स्वीट्स, दहीभात आणि सरते शेवटी लोणचं असाच काहीसा प्रकार )
एखाद्या चांगल्या संघाकडून ज्यावेळी आपण हार मानतो त्यावेळी क्रिकेट रसिक मोठ्या मनाने ती हार स्वीकारतात. परंतु ज्या नवख्या संघाला प्रथितयश संघ ज्यावेळी त्यांना क्रिकेटचे बाळकडू देतो, आणि काही वर्षातच त्यांच्याकडून ज्यावेळी  अपसेट व्हायला होतं त्यावेळी तो पराभव फार जिव्हारी लागतो. हे जिव्हारी लागणं काय असतं ते तुम्ही ऑस्ट्रेलिया संघाला विचारा. 2007 च्या पहिल्याच टी-20 वर्ल्ड कपमध्ये नवख्या झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती हे कोण विसरेल? त्यांची ती जखम अजूनही अश्वत्थामाच्या जखमेसारखी भळभळते. तशीच जखम 2016 मध्ये बांगलादेशने वेस्टइंडीजला दिली होती.
नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात जी एकदिवशीय विश्व कप स्पर्धा झाली होती त्यावेळी अफगाणिस्तान, नेदरलँड्स यासारख्या नवख्या संघामुळे रंगत कमी होणार असं वाटत होतं. परंतु अफगाणिस्ताने काय केलं हे आपण सर्वांनी बघितलं. नव्हे चकित होऊन आपण त्यांच्याकडे पूर्ण स्पर्धेत बघतच राहिलो. मागच्या झटपट सामन्यात अफगाणिस्तान तीन मोठे विजय मिळवेल अशी जर भविष्यवाणी केली असती तर ते निश्चितच धाडसाचे ठरले असते. नवख्या संघाने चुकून एखादा विजय मिळवला की आपण त्याला लगेच फ्लूक संबोधून मोकळे होतो. परंतु तोच संघ ज्यावेळी तीन बलाढ्या संघांना चितपट करतो, त्यावेळी मात्र आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण होते. याच नवख्या अफगाणिस्तानने स्पर्धेच्या कालावधीत फार मोठा दरारा निर्माण केला होता.
एकंदरीत काय तर नवख्या संघाकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. ज्यावेळी एखादा संघ नवख्या संघाकडून हरतो त्यावेळी तो खऱ्या अर्थाने बेचिराख होतो, हे आपण जवळपास सर्व विश्वचषक स्पर्धेत बघितले. थोडक्यात या विश्वचषक स्पर्धेत प्रतिष्ठित संघाला सावध रहावचं लागेल. अन्यथा खेळाडूंना प्रचंड रोष व अपमानाला सामोरं जावे लागेल. त्याची सुऊवात अमेरिकेने करून दिली आहे. आम्हाला जर हलक्यात घेतलं तर तुमचं क्रिकेटचे बिऱ्हाड जे अमेरिकेत आले आहे त्यांना लवकरच बाड बिस्तरा गुंडाळून लगेच मायदेशी परतावं लागेल, असाच काहीसा सज्जड दम अमेरिकेने दिलाय एवढं मात्र निश्चित. नवोदित संघाच्या गळाला कोणकोणते मोठे मासे लागतात याचे उत्तर आपल्याला पहिल्या पंधरा दिवसातच मिळेल. तूर्तास अमेरिका अभिनंदन अन् आगे बढो!