चंद्राबाबू नायडू आज शपथबद्ध होणार

चंद्राबाबू नायडू आज शपथबद्ध होणार

आंध्र प्रदेश विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, अमरावतीच राजधानी राहण्याची केली घोषणा
वृत्तसंस्था / विजयवाडा
लोकसभा निवडणुकीसमवेत झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि तेलगु देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आज बुधवारी शपथविधी होणार आहे. आंध्र प्रदेश विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमुखाने निवड मंगळवारी करण्यात आली. चंद्राबाबू नायडू यांनी निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जनसेना पक्षाचे नेते पवनकल्याण, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डी. पुरंदेश्वरी तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. सर्वांसह प्रशासन चालविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चंद्राबाबू नायडू यांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तेलगु देशम, जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. तसेच या पक्षांचे ज्येष्ठ नेतेही आले होते. चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा प्रस्ताव जनसेना पक्षाचे नेते पवनकल्याण यांनी मांडला. त्याला भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित खासदार आणि पक्षाच्या आंध्र प्रदेश शाखेच्या अध्यक्षा दाग्गुबती पुरंदेश्वरी यांनी अनुमोदन दिले. सर्व उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
अमरावती हीच राजधानी
जुन्या आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन 2013 मध्ये करण्यात येऊन तेलंगणाचे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले होते. हैद्राबाद ही आंध प्रदेशची राजधानी त्यानंतर तेलंगणाला मिळाली होती. त्यामुळे विभक्त आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचा प्रश्न निर्धाण झाला होता. आंध्रची राजधानी केवळ अमरावती हीच असेल, अशी घोषणा मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. तसेच विशाखापट्टणम आणि कर्नूल यांचाही सर्वतोपरी विकास केला जाईल. या शहरांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे आश्वासनही चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे.
रालोआला प्रचंड बहुमत
आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या 175 जागांपैकी या आघाडीने 164 जागा जिंकल्या असून यापूर्वी 5 वर्षे सत्तेवर असणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या तेलगु देशमला स्वत:ला 132 जागा मिळाल्या असून पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 24 जागांची प्राप्ती झाली असून भारतीय जनता पक्षालाही 8 जागा जिंकता आल्या आहेत.
नायडू यांची प्रशंसा
नायडू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी केलेल्या भाषणात पवन कल्याण यांनी नायडू यांच्या द्रष्टेपणाची प्रशंसा केली. राज्यात 5 वर्षे मनमानी चालविलेले सरकार आता गेले आहे. हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव झाला असून जनतेने आमचे सरकार प्रचंड बहुमताने निवडले आहे. राज्याला आज विकास आणि प्रगतीसाठी चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या अनुभवी आणि विकासदृष्टी असणाऱ्या नेत्याची आवश्यकता आहे. नायडू यांच्या नेतृत्वात राज्याचा चहुमुखी आणि वेगवान विकास होईल, असे प्रतिपादन पवन कल्याण यांनी केले.
एकत्रित संघर्षाचा विजय
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलगु देशम, जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एकत्रित संघर्ष केला. लोकांनी या आघाडीला भरभरुन यश दिले. या एकत्रित संघर्षाने भारतातील इतर पक्षांसमोर एक उदाहरण घालून दिले आहे. राज्याच्या प्रगतीला केंद्र सरकार बांधील असून केंद्राकडून शक्य ते सर्व साहाय्य देण्यात येईल, असे प्रतिपादन चंद्राबाबू नायडू यांच्या नावाच्या प्रस्तावाचे समर्थन केल्यानंतर पुरंदेश्वरी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य केंद्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. शपथविधी कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना देण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.