गॅस गळतीमुळे युवकाचा मृत्यू

गॅस गळतीमुळे युवकाचा मृत्यू

अन्य तिघे बेशुद्धावस्थेत सापडले : अजून एकाची प्रकृती चिंताजनक
वास्को : गॅस गळतीमुळे गुदमरल्याने एकाचा मृत्यू तर तिघे बेशुध्द होण्याची घटना वास्कोत रविवारी सकाळी उघडकीस आली. बेशुध्द पडलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. बंद खोलीत स्वयंपाक गॅस सुरूच राहिल्याने झोपेतच चौघेही युवक गुदमरले. मयताचे नाव संजय बिंद तर इतर युवकांची नावे अनिल बिंद, अमन यादव व धरमवीर बिंद अशी आहेत. चौघेही पंचवीशीतील असून तिघांवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना वास्कोतील मांगोरहिल जवळील फकीर गल्ली भागात घडली. मूळ बनारसमधील असलेले हे युवक या भागात भाड्याच्या खोलीत राहत होते.
नोकरीच्या शोधात आले गोव्यात
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बनारसमधून आठ युवकांचा गट नोकरी शोधण्याच्या निमित्ताने गोव्यात आला होता. वास्कोत स्थायिक झालेल्या एका युवकाने त्यांची सोय फकीर गल्ली भागात भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये केली होती. दोन्ही खोल्या जवळच आहेत. एका खोलीत चारजण राहत होते तर दुसऱ्या खोलीत चार जण राहात होते. शनिवारी रात्री एका खोलीतील चार  जण झोपण्यापूर्वी स्वयंपाक गॅसचा सिलिंडर बंद करण्यास विसरल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातूनच ही दुर्घटना घडली.
गॅस गळतीमुळे गुदमरल्याने दुर्घटना
एका खोलीतील चारही युवक कितीही दरवाजा ठोठावला तरी उठत नसल्याचे दिसून आल्याने दुसऱ्या खोलीतील चारही युवक घाबरले. त्यांनी शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून त्या खोलीत प्रवेश केला असता, चौघेही युवक बेशुध्दा अवस्थेत असल्याचे आढळून आले. एकाच्या तोंडातून रक्तही येत होते. त्यामुळे पोलीस व रूग्णवाहिका बोलावण्यात आली.
एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
चौघानाही चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, त्यांच्यापैकी संजय बिंद या युवकाला मृत घोषीत करण्यात आले. इतर तिघा युवकांना गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले. तिघांपैकी एका युवकाची प्रकृती चिंताजनक तर दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली.
 रात्री गॅस बंद करण्यास विसरले अन्…
घटनास्थळी अग्निशामक दलानेही पाहणी केली. खोलीत गॅस सुरूच होता. रात्री झोपण्यापूर्वी त्या युवकांनी गॅस बंद केलाच नव्हता, अशी शक्यता आहे. त्यामुळे त्या बंद खोलीत गॅस साचून राहिला व झोपेत असतानाच त्या युवकांचा श्वास कोंडला गेला. त्यात ते बेशुध्द पडले. एकावर मृत्यू ओढवला. सुदैवाने इतर युवकांचा जीव वाचला. वास्को पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.