जलसंकट आणि दिलासा

जलसंकट आणि दिलासा

अल् निनोच्या प्रभावामुळे गेल्यावर्षी पावसावर खूप गंभीर परिणाम झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन हजार खेड्यात सध्या गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. राज्यभरातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा तीन हजार धरणांमध्ये मिळून 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याआधीच्या वर्षात हाच पाणीसाठा 55 टक्केपेक्षा जास्त होता आणि त्यामुळे त्यावेळी जलसंकट जाणवले नाही. मात्र यावेळी जून ते सप्टेंबर आणि परतीच्या पावसाचे आक्टोबरमध्येही येणे झाले नाही. परिणामी कमी पावसावर यंदाचे वर्ष काढावे लागणार आणि पाणी जपून वापरावे लागणार हे निश्चित झाले होते. मात्र पाणीसाठा चाळीस टक्क्यांवर आल्यानंतर मात्र पुढचे दोन, अडीच महिने कसे काढायचे याची चिंता लागून राहिलेली आहे. एक तर गेल्यावर्षीचा उन्हाळा हा जगातील सर्वात भयंकर उन्हाळ्यांपैकी एक ठरला होता. त्याचा प्रभाव यावर्षीच्या उन्हाळ्यातही जाणवणार आणि तीव्र झळा बसणार असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला असून शिमग्याच्या सुमारास असलेली स्थिती लक्षात घेतली तर एप्रिल आणि मे मधील वातावरण किती भयंकर असेल आणि यातून स्वत:चा आणि स्वत:भोवतीच्या पर्यावरणाचा बचाव कसा करायचा याची चिंता लागणे स्वाभाविक आहे. प्राणी, पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामापासून बचावासाठी आणि स्वत:लाही उन्हाचा फटका बसू नये म्हणून लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असणारी धडपड दिसू लागली आहे. यावेळी उन्हापासून वाचतानाच पाणीसाठाही वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. पाण्यावर उन्हाचा प्रभाव सर्वाधिक होतो आणि बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणावर वाफ निर्माण होऊन पाण्याची पातळी घटत जाते. परिणामी अधिकच्या टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येते. बदलत्या ऋतुचक्रात अशा प्रकारची संकटे ही नेहमीच येत असतात. सध्याचे संकट हे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी पुरविण्यास सुचविते आहे. म्हणजेच जुनच्या किमान दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि त्यानंतरही जुलैपर्यंत हे पाणी पुरले पाहिजे हेच यातून दिसून येत आहे. त्यातल्या त्यात या जलसंकटात दिलासा मिळाला आहे तो, अमेरिकेतील नोआ संस्थेच्या अंदाजाचा. अल् निनोमुळे गेल्यावेळच्या मान्सुनने गुंगारा दिला. पण, यावेळी ला निनो स्थितीमुळे मान्सून दमदार असेल अशी आशा त्यांनी जागवली आहे. लवकरच भारतीय हवामान विभाग आपला अधिकृत अंदाज व्यक्त करेलच. पण, ही घोषणासुध्दा घामाघूम झालेल्या मानवजातीवर दिलाशाची फुंकर घालणारी ठरणार आहे.जून ते
ऑगस्टच्या दरम्यान ला निनो  निर्माण होणार असून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तो उंचीवर असेल. मान्सूनवर चांगला परिणाम करेल असे काही वातावरण दिसत आहे. त्यानुसार प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीचे तापमान कमी होत आहे. इंडियन ओशन डायपोलही सकारात्मक राहणार असून तो देखील मान्सूनवर चांगला परिणाम करण्याची शक्यता नोआने व्यक्त केलेली आहे. सध्या चाळीशीपार गेलेला पारा आणि त्यामुळे अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण झाल्यानंतर शनिवारी राज्यभरात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले. रविवारीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. एका अर्थाने 31 मार्चला पावसाने काही ठिकाणी का होईना उन्हाचा हिशेब चुकता केला. या सगळ्या वातावरणामुळे एक चांगला संकेत मिळतो आहे. एप्रिल आणि मे असे दोन महिने उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार असतानाच जूनमध्ये दमदार पावसाला सुरूवात होईल हा दिलासासुध्दा प्रत्येक घटकाला उद्याची आशा निर्माण करणारा ठरणार आहे. एका वर्षी प्रचंड जलटंचाई आणि एकावर्षी प्रचंड पाऊस अशा स्थितीत आता या वर्षीचा पाऊस नव्याने काही आव्हानेही घेऊन येईल. राज्यात महापुराचे पाणी इतरत्र वळविण्याच्या योजनांना जगतिक पातळीवरून पैसा उभा करून हे पाणी बारमाही वापरासाठी मराठावाड्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सह्याद्रीच्या कुशीत होतो आहे. हा एक अफलातून प्रयोग असेल जो प्रत्यक्षात आला आणि खरोखर जोरदार पाऊस पडलातरीही पावसाच्या पाण्याने नुकसान न होता मराठवाड्यातील जनतेचे कल्याण झाले तर महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्याबरोबरच आज आरक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांचे निर्माण झालेले गुंते सुध्दा सुटण्यास मदत ठरू शकते. पाण्याचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर वेगवेगळ्या पध्दतीने होत असला तरी जिथे पाणी तेथे समृध्दी असते आणि ही समृध्दी एका समृध्द संस्कृतीला जन्म देत असते. एक स्वाभिमानी, कष्टाळू आणि तितकाच प्रगल्भ,समाधानी समाज निर्माण होत असतो. नदीच्या काठांचा संपन्न परिसर हजारोवर्षांपासून आपल्या आगळ्या वेगळ्या जीवनशैलीसाठी प्रसिध्द आहे. त्यासाठीच लोक तीर्थाटन करत असतात. जल हे तत्व अशा अनेक अंगाने मानवी जीवनावर प्रभाव पाडत असते. या प्रभावाची आताची स्थिती ही जीवन समृध्द करण्यासाठी आणि वनवास संपुष्टात आणण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. ही उपयुक्तता खूपच आवश्यक अशी असते. दुष्काळी आणि सुकाळी भागाचे दोन भाग केले किंवा त्यांची एकमेकांच्या स्थितीशी तुलना केली तर जे सत्य उघड्या डोळ्यालाही सहज समजेल ते आजच्या स्थितीचे संपूर्ण राज्याचे चित्र आहे. पुढचे दोन महिने दुष्काळ महाराष्ट्राची सत्वपरीक्षा पाहणार आहे. माणसांना आणि जनावरांना पोटभर अन्न मिळण्याचे संकट आता उरलेले नाही. पण, पाणी मिळण्याचे संकट मात्र निर्माण झाले आहे. मोठमोठाली धरणे सुध्दा जिथे संकट भासू लागली आहेत त्याचवेळी या संकटातून सुटका करणारा एक अजस्त्र प्रकल्पसुध्दा साकारला जात आहे. अशा स्थितीत तरीही पाण्याचे नियोजन करणे, जलसाठ्याचे संवर्धन करणे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीच्या खोल उदरात शतकानुशतके सुरक्षित जपून राहिल अशी स्थिती निर्माण करणे आवश्यक बनलेले आहे. जलसंकट आणि नंतरच्या दिलाशाच्या दरम्यानच्या काळात धोरणकर्त्यांबरोबरच जनतेनेसुध्दा याचा विचार करणे आवश्यक बनलेले आहे.