सिद्धापूर तालुक्यातील दोघांचा माकडतापामुळे मृत्यू

सिद्धापूर तालुक्यातील दोघांचा माकडतापामुळे मृत्यू

कारवार : माकडतापामुळे मृत्यू झालेल्या त्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. काही दिवसापूर्वी सिद्धापूर तालुक्यातील मुल्लाजे•ाr येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा माकडतापामुळे मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मिळणारी मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या घराच्या आजुबाजूच्या परिसराचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या घराच्या आजुबाजूला वाढलेले गवत कापून टाकण्याची सूचना वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. माकडताप प्रभावीत प्रदेशात खबरदारीचा उपाय म्हणून कीटकनाशके फवारण्याची सूचना करून नागरिकांमध्ये माकडतापाबद्दल जागृती करण्यासाठी अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, माकडतापामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. तथापी मृत माकड आढळून आल्यास त्याची माहिती अरण्य आणि आरोग्य खात्याला तातडीने द्यावी. त्याचबरोबर आरोग्य खात्याने सुचविलेल्या खबरदारी उपायांचे काटेकोर पालन करावे. यावेळी शिरसीचे असिस्टंट कमिशनर अपर्णा रमेश, सिद्धापूर तहसीलदार विश्वजीत मेहतसह अरण्य आरोग्य आणि आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.