निवेदनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तासभर प्रतीक्षा

निवेदनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तासभर प्रतीक्षा

विविध मागण्यांसाठी  शेतकऱ्यांचा मोर्चा : कार्यालयात घुसून आंदोलन
बेळगाव : विविध शेतकरी संघटनांकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान पोलिसांमध्ये बाचाबाची झाली तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्वीकारण्यासाठी तासभर उभे रहावे लागले. कर्जवसुली त्वरित थांबवावी व कर्जमाफी करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांकडून मंगळवारी मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न करताना पोलिसांकडून अडविले. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार संघर्ष करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणाऱ्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी यावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी जवळपास तासभरापेक्षा अधिक काळ आंदोलन करून आपल्या मागण्या सांगितल्या. शेतकरी नेत्यांनी आपापले म्हणणे मांडले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तासभरापेक्षा अधिक काळ शांत उभे राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारुन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.