प्रतिक्षा संपली, शिरोळमध्ये होणार तालुका क्रीडा संकुल; 23 वर्षांनी मिळाली सात एकर जागा

प्रतिक्षा संपली, शिरोळमध्ये होणार तालुका क्रीडा संकुल; 23 वर्षांनी मिळाली सात एकर जागा

 विविध खेळांची क्रीडांगणे बनवण्यासाठी शासनाकडून पाच कोटी ऊपयांचा निधी

संग्राम काटकर कोल्हापूर

तब्बल 23 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शिरोळ तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणासाठी शिरोळमधील आयटीआय संस्थेजवळील 7 एकराची जागा मिळाली आहे. शासनाच्या महसूल विभागाने जागेला मंजूरी देऊन ती तालुका क्रीडा संकुल समितीच्या ताब्यातही दिली आहे. जागेचा सात-बारासुद्धा तयार केला आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आता क्रीडा संकुल उभारणीसाठी तब्बल पाच कोटी ऊपयांचा निधी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिंता संपल्यानंतर क्रीडा संकुलात कोणकोणत्या खेळांची क्रीडांगणे बनवली जाणार याचा आराखडा तयार केला जाईल. तो मंजूर करवून घेण्याबरोबर निधी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव क्रीडा व युवक संचालनायलाकडे पाठवण्यात येणार आहे.
महाराष्ट्राला सहकाराबरोबर क्रीडा क्षेत्राचीही उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आणखी वृद्धींगत करण्यासाठी तत्कालिन सरकारने 23 वषापूर्वी महाराष्ट्रातील जिह्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल उभारणीचा निर्णय घेऊन अमंलबजावणीला सुऊवात केली. विविध खेळांच्या खेळाडूंना सरावासाठी मैदान असावे, त्यांना राष्ट्रकुल, आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिकमधील क्रीडा स्पर्धांपर्यंत झेप घेता यावी असेही तालुका क्रीडा संकुल उभारणीमागे शासनाने व्हिजन होते. विविध खेळांमध्ये खेळाडूंची जणू खाणच असलेल्या कोल्हापूर जिह्यात 23 वर्षांपूर्वी तालुकानिहाय 12 क्रीडा संकुले उभारणीचे धोरण ठरवण्यात आले. शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार मिळत राहिलेल्या कोट्यावधी ऊपयांच्या निधीतून करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा, भुदरगड, चंदगड येथील तालुका क्रीडा संकुलात खेळांची मैदाने बनवली गेली. मात्र शिल्लक कामे निधी अभावी रखडली गेली. ती आज तागायत रखडलेलीच आहे. कामे लवकर पूर्ण करून क्रीडा संकुले स्पर्धा, सरावासाठी खुली करा, अशी मागणी खेळाडू, क्रीडा संघटनांकडून सतत होत राहिली. पण या मागणीकडे आजतागायत गांभिर्याने पाहिले गेलेले नाही.
क्रीडा संकुलात होणार पाच खेळांची क्रीडांगणे
अतिउशिराने का होईना पण पाच वर्षांपूर्वी शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी जागा पाहिली गेली, पण ती तालुका क्रीडा संकुल समितीकडे मिळवण्यासाठीच्या जोरकस हालचाली होत नव्हत्या. दरम्यानच्या काळात खेळाडू व क्रीडा संघटनांनी उठवलेल्या आवाजाकडे गांभिर्याने पाहून समितीने शिरोळमधील आयटीआय संस्थेजवळील जागा मिळणे शक्य होईल, अशा हालचाली केल्या. क्रीडा संकुल उभारणीसाठी किमान 7 एकर जागा मिळेल याची खातरजमा कऊन तसा प्रस्ताव महसुल विभागाकडे 2021 साली समितीने पाठवला. या विभागाने ऑक्टोबर 2023 साली जागेला मंजूर देऊन डिसेंबर 2023 ला जागा समितीच्या ताब्यात दिली. जागा ताब्यात मिळाल्यानंतर शिरोळमध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात याला प्राधान्य देऊन त्यानुसार क्रीडा संकुलात क्रीडांगणे उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसारच क्रीडा संकुलात 200 मीटरच्या धावण ट्रॅकसह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या खेळांची प्रत्येकी 2, बास्केटबॉलचे 1 मैदान तयार केले जाणार आहे. तसेच 1 इनडोअर हॉल व 100 मुले-मुली निवास कऊ शकतील असे वसतीगृह व कार्यालयही उभारण्यात येणार आहे. शिरोळ तालुका क्रीडा संकुल उभारणीबरोबरच या संकुलात क्रीडांगणांसह अन्य सोयी-सुविधा तयार करण्याचे कामाचे तब्बल 22 वर्षानंतर का होईना पण एकदाशे कागदावर आले आहे. त्यामुळे आता शिरोळ तालुका क्रीडा संकुल समितीची जबाबदारी वाढली आहे. ही समिती आता क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने काय पाऊले उचलणार, हेच महत्वाचे आहे.
शिरोळ तालुका क्रीडा संकुलात विविध खेळांची क्रीडांगणे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आराखडा तयार करावा लागले. हा आराखडा तयार करणारा ऑर्किटेक्ट शासनाच्या पॅनेलमधूनच निवडण्यात येणार आहे. आर्किटेक्टकडून आराखडा बनवून घेऊन त्यानुसार क्रीडांगणे उभारणीसाठी लागणारा निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार कऊन तो क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे पाठवला जाईल.
तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे (सचिव : शिरोळ तालुका क्रीडा संकुल समिती)