जहाजाची धडक, ब्रिज कोसळला

जहाजाची धडक, ब्रिज कोसळला

अमेरिकेच्या बाल्टीमोरमध्ये दुर्घटना : जीवितहानी झाल्याची शक्यता
वृत्तसंस्था/बाल्टीमोर
अमेरिकेच्या बाल्टीमोर येथे सर्वात लांब फ्रान्सिस स्कॉट ब्रिज मंगळवारी सकाळी एक मोठे मालवाहू जहाज आदळल्याने पाण्यात कोसळले आहे. पूल कोसळण्यापूर्वी त्यावर आग लागली आणि अनेक वाहने पाण्यात कोसळल्याचे समजते.  श्रीलंकेच्या दिशेने प्रवास करत असलेल्या संबंधित जहाजावर 22 भारतीय होते आणि या दुर्घटनेत त्यांना कुठलीच ईजा झाली नसल्याचे समोर आले आहे.
दुर्घटनेवेळी 7 कामगार आणि 3-4 नागरिक ब्रिजवर होते. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले असून जीवितहानीची अद्याप पुष्टी झालेली नाही. दुर्घटनेनंतर ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही दिशांनी येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. घटनास्थळी बचावकार्य राबविण्यात येत असून अनेक जण जखमी झाले आहेत.
ब्रिजला धडकलेल्या जहाजाची लांबी 948 फूट इतकी होती. धडकेनंतर जहाज बुडाले आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ब्रिजची लांबी 3 किलोमीटर इतकी आहे. दाली नावाच्या जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता. हे जहाज ग्रेस ओशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असून याचे नियंत्रण सिनर्जी मरीन ग्रुपकडे होते.
पेटाप्सको नदीवरील हा ब्रिज 1977 मध्ये निर्माण करण्यात आला होता. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. सध्या आम्ही नदीत 7 जणांचा शोध घेत आहोत अशी माहिती बाल्टीमोर फायर डिपार्टमेंटचे कम्युनिकेशन डायरेक्टर केविन कार्टराईट यांनी दिली आहे.
बाल्टीमोरचे महापौर ब्रँडन स्कॉट यांनी दुर्घटनेची दखल घेत आपत्कालीन सेवा घटनास्थळी कार्य करत असल्याचे सांगितले आहे. फ्रान्सिस स्कॉटचा हा ब्रिज वॉशिंग्टन मेट्रोपोलिटन रिजनमध्ये एक महत्त्वपूर्ण ट्रान्सपोर्टेशन लिंक आहे, कारण हा ब्रिज वॉशिंग्टन, डीसीच्या जॉर्जटाउनला आर्लिंग्टन, वर्जीनियाच्या रॉसलिनशी जोडतो. या ब्रिजला फ्रान्सिस स्कॉट यांचे नाव देण्यात आले आहे. स्कॉट यांनीच अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिले आहे.