दु:ख पर्वताएवढे…

दु:ख पर्वताएवढे…

दिनमेकं शशी पूर्ण: क्षीणस्तु बहुवासरान्।
सुखाद्दु:खं सुराणामप्यधिकं का कथा नृणाम्?
अर्थ-महिन्यातून फक्त पौर्णिमेच्या एका दिवशी चंद्राचे पूर्ण बिंब असते आणि इतर सर्व दिवस ते क्षीण झालेले दिसते. म्हणजे देवालासुद्धा सुखापेक्षा दु:खच जास्त असते तर माणसांची काय कथा?
हे वाचलं आणि एक गोष्ट आठवली. एकदा रस्त्याने एक भिकारी ओरडत चालला होता. देवाने मला काही दिलं नाही, माझ्यावर खूप अन्याय केलाय, माझ्याच वाट्याला हे सगळं दु:ख का? असे ओरडत होता. त्या भिकाऱ्याला पकडून राजाकडे आणलं. राजांनी त्याला रडण्याचे कारण विचारल्यावर म्हणाला… तुम्हाला बघा ना केवढे वैभव, मला काही दिलं नाही. देवाने तुम्हाला एवढे मोठे राज्य दिले, पैसा दिला आणि माझ्याकडे काही नाही. राजाच्या लक्षात आलं. राजा हसून म्हणाला ठीक आहे मी तुला काही देईन पण त्या बदल्यात मी मागेन ती गोष्ट तुला द्यायला लागेल. किती हवेत तुला. त्यांनी सांगितलं पाच लाख. राजा म्हणाला ठीक आहे मी तुला देतो पण त्याच्या बदल्यात तुझा एक हात मला दे. दहा लाख हवे असतील तर दोन हात दे. असं करत त्यांनी त्याच्या सगळ्या शरीराची किंमत सांगितल्यावर तो भिकारी रडायचा थांबला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे हे सगळं असताना आपण मात्र दु:खी असल्याचं सांगत रडत बसतोय. म्हणजेच दु:ख हे प्रत्येकाला असलं तरी ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. धडधाकट शरीर देऊनही असे रडत असतील तर त्यांनी अपंग माणसाकडे पाहिले पाहिजे. आपल्यापेक्षा त्याचं दु:ख मोठं हे लक्षात घ्यायला हवं.
आम्ही सतत दुसऱ्याच्या तुलनेत जगत असल्यामुळे आपल्याकडे जी गोष्ट नाही, त्याचं दु:ख सातत्याने करतो. पण आपल्याकडे काय आहे हे मोजायचं विसरून जातो. चंद्र लहानसा असला तरी एक दिवस मोठा होतोच. ही गोष्ट ज्याला कळते तो आपल्या छोट्या छोट्या कामातून थोडे थोडे पैसे मिळवून एक दिवस मोठा बनतो. पण तेव्हाही त्याच्या लक्षात येतं की पैसा नव्हता तेव्हा वेगळं दु:ख आणि पैसा आल्यानंतर वेगळं दु:ख आपल्या वाट्याला आलेय. म्हणजेच पूर्वीच्या काळी एक म्हण होती ‘एक पुती रडते आणि सातपुती रडते’. एक मूल असलेली पण दु:खी आहेच तर सात मुलं असलेलीही दु:खी आहे आणि मुलं नसलेलीही दु:खी आहे. म्हणजे दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला आहे.
अशावेळी आम्हाला दुसऱ्याचं दु:ख दूर करता आलं तर तर खऱ्या आनंदाच्या वाटा सापडतात. पण आम्ही नेहमी दुसऱ्याला दु:ख झालं, काही अपघात झाला किंवा तोटा आला तर आम्हाला आनंद वाटतो. ही गोष्ट जेव्हा थांबेल त्या वेळेला खऱ्या अर्थाने आम्ही आनंद शोधायला निघतो. कुणाच्या अडचणीच्या काळात आपण मदत केली तर आपल्याला दु:ख न होता आनंदच होतो. आणि मग लक्षात येतं की, ‘दुनिया मे कितना गम है, मेरा गम सबसे कम है’. अशा वेळेला माणसाने दुसऱ्याच्या दु:खाची मोजदाद करण्यापेक्षा किंवा स्वत:च्या दु:खाचे पाढे वाचण्यापेक्षा त्या दु:खाचं व्यवस्थापन कसं करता येईल याची काळजी घेतली पाहिजे. किंवा या कामांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं पाहिजे. पण आम्ही नेमकं आमच्या दु:खाचं प्रदर्शन मांडतो. जेवढा मोठा श्रीमंत माणूस तेवढं त्याचं दु:ख मोठं. जेवढा पगार मोठा तेवढे शून्य मोठे, तेवढे दु:खाचे वाटेसुद्धा मोठे. हे लक्षात यायला आम्हाला मोठं व्हावं लागतं आणि दु:खी व्हायला लागतं. असलेल्या दु:खामध्येच आम्ही सुखाच्या वाटा शोधल्या तर आमच्या लक्षात येईल की दु:ख जरी डोंगराएवढं असलं तरी एखाद्या कणाएवढं सुख हे मिळतंच. ते शोधण्याची नजर आमच्याकडे असायला हवी आणि ते सोडून देण्याची दृष्टी आमच्याकडे हवी. म्हटलेलंच आहे ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे…..’