म. ए. समितीही लोकसभा निवडणूक लढविणार

म. ए. समितीही लोकसभा निवडणूक लढविणार

कमिटीची स्थापना : येत्या चार दिवसांत उमेदवार जाहीर करणार
बेळगाव : सीमाप्रश्नासाठी मागील 67 वर्षांपासून म. ए. समिती एका जिद्दीने लोकशाहीमार्गे लढा देत आहे. निवडणूक लढविणे हा देखील एक लढ्याचाच भाग आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती आणि शहर म. ए. समितीच्या संयुक्त बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जास्तीतजास्त म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल करून एक नवा इतिहास रचण्याचे आवाहन केले आहे.  लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. लोकसभा निवडणूक लढवून संपूर्ण देशाचे लक्ष या प्रश्नाकडे वळविले पाहिजे. सीमाभागामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक आहेत. त्यामुळे म. ए. समितीचा उमेदवार निश्चितच विजय होऊ शकतो. मात्र यासाठी एकजूट असण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शुक्रवारी रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. म. ए. समितीचा उमेदवार ठरविण्यासाठी 21 जणांची कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. या कमिटीची बैठक येत्या चार दिवसांत होणार असून यामध्ये समितीचा उमेदवार ठरविला जाणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, म. ए. समिती नेते प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, बी. ए. येतोजी, रणजित चव्हाण-पाटील उपस्थित होते.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी आपली वेगवेगळी मते बैठकीत व्यक्त केली. काही जणांनी नोटा, निवडणुकीवर बहिष्कार, जास्तीतजास्त उमेदवारी दाखल करणे तर काही जणांनी एकच उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला. म. ए. समितीचा एकच उमेदवार देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, अधिक मताधिक्यांनी विजयी करण्याचे बोलून दाखविले. माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर म्हणाले, 1956 पासून भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर सीमाभागावर अन्याय झाला. त्यामुळे त्याविरोधात मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा दिला आहे. सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक उमेदवार द्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मदन बामणे म्हणाले, माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी जि. पं., ता. पं. सदस्य, माजी ग्रा. पं. सदस्य यांनी एकत्रितपणे पाच हजार अर्ज दाखल करावेत, असे त्यांनी सांगितले. शुभम शेळके म्हणाले, समिती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया. रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, समितीचा उमेदवार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारा असावा आणि कार्य करणारा असावा, निवडणूक लढविण्याकरिता न राहता कायम कार्यरत राहणारा असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आर. एम. चौगुले, महादेव पाटील, रमेश पावले, डी. बी. पाटील, शंकर बाबली, सागर पाटील, श्रीकांत मांडेकर, बी. डी. मोहनगेकर, युवा म. ए. समितीचे धनंजय पाटील, रणजित हावळाणाचे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अनिल पाटील आदी कार्यकर्त्यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.