खुद्द न्यायमूर्ती आज करणार ‘स्मार्ट सिटी’ कामांची पाहणी

खुद्द न्यायमूर्ती आज करणार ‘स्मार्ट सिटी’ कामांची पाहणी

सायंकाळी 5 वाजता  उतरणार पणजीतील रस्त्यांवर
पणजी : स्मार्ट सिटीतर्फे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा भविष्यात उपयोगी आणि शहराच्या सौंदर्यातही भर घालणाऱ्या ठरणाऱ्या असल्या तरी सध्या या कामांचे नियोजन तथा व्यवस्थापनातील अभाव आणि हलगर्जीपणामुळे प्रदूषण एवढे विकोपाला गेले की लोकांवर अक्षरश: न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली. या तक्रारींची दखल घेताना खुद्द न्यायमूर्तीनी त्या कामांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दि. 1 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या प्रदूषणाची पाहणी करणार आहेत. या याचिकांच्या माध्यमातून खास करून वयोवृद्ध नागरिकांनी धूळ प्रदूषणामुळे वाढलेले फुफ्फुसाचे आजार तसेच श्वसनाच्या समस्या आदींवर प्रकाश टाकला होता. त्याचबरोबर कामांच्या ठिकाणी वातावरणातील गुणवत्ता निरीक्षण केंद्रे स्थापन करणे, ट्रक माऊंटेड मेकॅनिकल रोड स्वीपिंग यंत्रांद्वारे रस्ते झाडणे आणि धूळ साफ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर वापरणे, प्रदूषण रोखणे व नियंत्रणासाठी स्मॉग गन सारखी यंत्रणा वापरणे, काम सुरू असलेल्या रस्त्यांवर किमान दोन वेळा पाणी फवारणे, जागोजागी सूचना फलक लावणे, त्याशिवाय सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस वा ट्राफिक मार्शल तैनात करणे, यासारख्या उपाययोजना घेण्याचे आवाहन केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कामे नक्की केव्हा पूर्ण होतील याची किमान माहिती संबंधित कंत्राटदाराने किंवा स्मार्ट सिटी एजन्सीने जाहीररित्या द्यावी अशी मागणीही करण्यात आली होती. राजधानीत सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे एकाचवेळी हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. गत दोन वर्षांपासून चाललेल्या या कामांमुळे लोक अक्षरश: हैराण झालेले आहेत. परिणामस्वरूप शहरातील ऊग्णालयांकडे जाणारे मार्गही पूर्ण किंवा अंशत: बंद झाले आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत वाहन तेथे जाऊ शकत नसल्याने जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते. या सर्व बाबींची आज सायंकाळी 5 वा. न्यायमूर्तीकडून पाहणी करण्यात येणार आहे.