मनपाच्या 28 नगरसेवकांनी दिला नाही खर्चाचा तपशील

मनपाच्या 28 नगरसेवकांनी दिला नाही खर्चाचा तपशील

सोमवारनंतर लोकायुक्तांना अहवाल पाठविणार
बेळगाव : महानगरपालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटली तरी यामधील 28 नगरसेवकांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा तपशील दिला नाही. लोकायुक्तांनी याबाबत संबंधित नगरसेवकांनी खर्चाचा तपशील तातडीने द्यावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर कौन्सिल विभागाने संबंधित नगरसेवकांना सात दिवसांत खर्चाची माहिती देण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. तरी देखील अजूनही नगरसेवकांनी खर्चाचा तपशील दिला नाही. त्यामुळे आता लोकायुक्त कोणता निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीच्या खर्चाचा तपशील दिला पाहिजे. मात्र विद्यमान 28 नगरसेवकांनी अजूनही खर्चाबाबतची माहिती दिली नाही. महानगरपालिकेने नोटीस पाठवून पाच दिवस उलटले आहेत. सोमवार दि. 27 रोजी शेवटचा दिवस आहे. जर याबाबत नगरसेवकांनी दखल घेतली नाही तर महानगरपालिकेतील कौन्सिल विभाग लोकायुक्तांकडे खर्च दिला नसल्याबाबतचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर काही नगरसेवकांनी त्या निवडणुकीबाबतच्या खर्चाचा तपशील दिला आहे. मात्र अजूनही 28 नगरसेवकांनी खर्चाचा तपशील दिला नाही. त्यामुळे मनपाच्या कौन्सिल विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. आता सोमवारनंतर महानगरपालिकेतील कौन्सिल विभाग लोकायुक्तांना माहिती देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खर्चाचा तपशील न दिलेले नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.