सुवर्णदुर्गः कान्होजी आंग्रेंनी अरबी समुद्रातल्या या किल्ल्यामुळे रोवले पाय

ज्याचे आरमार त्याचा समुद्र… ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचं आपलं स्थान बळकट करत होता. या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं …

सुवर्णदुर्गः कान्होजी आंग्रेंनी अरबी समुद्रातल्या या किल्ल्यामुळे रोवले पाय

– ओंकार करंबेळकर

ज्याचे आरमार त्याचा समुद्र… ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचं आपलं स्थान बळकट करत होता.

 

या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळेच 1657 साली त्यांनी मराठा आरमाराचा पाया घातला.

 

पोर्तुगीज, इंग्रज, डच, आदिलशहा, मुघल, सिद्दी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाल्याचं दिसून येतं.

 

युद्धनौकांच्या बांधणीबरोबर जलदुर्गांकडेही छ. शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं. त्यांच्या काळात दुर्गाडी, सिंधुदुर्ग, खांदेरी, कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले. तसेच विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जयगड, गोपाळगड हे जलदुर्ग त्यांनी स्वराज्यात आणले आणि त्यांची डागडुजी केली.

 

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर या आरमारामुळे एक जलदुर्गांची माळच उभी राहिलेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तरेस बाणकोट म्हणजेच हिम्मतगडापासून ते दक्षिणेस यशवंतगडापर्यंत अनेक दुर्ग आहेत.

 

यापैकीच एका महत्त्वाच्या सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची माहिती आपण ‘किल्ल्यांची गोष्ट’ या मालिकेत घेणार आहोत.

 

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ हर्णे या गावाजवळच्या समुद्रात सुवर्णदुर्ग आहे. सुवर्णदुर्ग हा वेगळा दुर्ग असला तरी त्याच्या रक्षणाला फत्तेगड, गोवागड आणि कनकदुर्ग हे तीन किल्ले त्याच्या बाजूला आहेत.

 

अगदी जवळ असणाऱ्या या तीन लहानशा किल्ल्यांमुळे सुवर्णदुर्गाला अतिशय सुरक्षित स्थान मिळालं आहे. सर्व बाजूंनी समुद्राचं रक्षण आणि त्याबरोबर या तीन किल्ल्यांचा जागता पहारा यामुळे निश्चितच त्या काळामध्ये सुवर्णदुर्गाचं महत्त्व वाढलं असणार.

 

सुवर्णदुर्ग कुठे आहे?

सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात अरबी समुद्रात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी दापोलीमधून हर्णे बंदर इथं जावं लागतं.

 

हर्णे गावाच्या किनाऱ्यावर कनकदुर्ग, गोवागड आणि फत्तेगड हे किल्ले आहेत. तर सुवर्णदुर्ग पाण्यात उभा असलेला दिसतो.

 

सुुवर्णदुर्गाच्या बरोबर समोर मुख्यभूमीवर गोवा किल्ला आहे. गोवा किल्ल्यावर तटबंदी, भिंती, बुरुज असे अवशेष आजही आहेत. त्याच्या दक्षिणेस फत्तेगड किल्ला आहे. मात्र या किल्ल्यावर आज मानवी वस्ती आणि घरांची दाटी झाली आहे.

 

फत्तेगडाच्या दक्षिणेस समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या पट्ट्याच्या शेवटी कनकदुर्ग आहे. कनकदुर्गावर दीपस्तंभ बांधण्यात आलेला आहे.

 

सुवर्णदुर्गावरील बांधकामं बहुतांश जमीनदोस्त झाली असली तरी काही ठळक गोष्टी पाहायला मिळतात. याच्या महादरवाजाजवळ मारुतीचे शिल्प कोरले असून दरवाजाच्या पायात कासवाचे शिल्प कोरले आहे. या दरवाजाच्या पायऱ्या चढून गेल्यावर आत खोल्या आणि देवडी दिसून येतात.

 

आतमध्ये बहुतांश गवत आणि झाडी उगवलेली असली तरी तटबंदी आणि बुरुज पाहाण्यासारखे आहेत. सुवर्णदुर्गावर पाण्याचा तलाव, टाकं आणि चोरदरवाजा आजही पाहायला मिळतो.

 

सुवर्णदुर्गाचा इतिहास

इतिहास अभ्यासक भगवान चिले यांनी आपल्या वेध जलदुर्गांचा या पुस्तकात सुवर्णदुर्गाच्या इतिहासाबद्दल लिहिले आहे, या दुर्गाचा इतिहास शिलाहारांच्या काळापासून सुरू होतो असं ते लिहितात. 1660 साली हा किल्ला छ. शिवरायांनी अदिलशाहाकडून जिंकून घेतला.

 

1671 साली छ. शिवाजी महाराजांच्या एका पत्रात या दुर्गाच्या डागडुजीसाठी 10 हजार होनांची तरतूद केल्याचंही दिसून येतं. सुवर्णदुर्गाला त्यांनी किती महत्त्व दिलं होतं ते यातून दिसून येतं.

 

सुवर्णदुर्ग आणि कान्होजी आंग्रे

सुवर्णदुर्ग किल्ला आणि कान्होजी आंग्रे यांचा अगदी जवळचा संबंध आहे. कान्होजी आंग्रे घडलेच मुळी सुवर्णदुर्गाच्या परिसरात आणि यांच्या नेतृत्वगुणाची चुणूकही पहिल्यांदा इथंच दिसली.

 

कान्होजी आंग्रे हर्णै येथील जोशी नावाच्या कुटुंबात शिकायला होते. कान्होजी आंग्रे शिक्षणानंतर सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे नोकरी करू लागले. परंतु 1694 पासून अचलोजी तेव्हा गादीवर असणाऱ्या छ. राजाराम महाराज यांना जुमानेसे झाले.

 

1698 साली तर ते सिद्दीला सामील झाले आहेत असा संशय कान्होजींना आला. त्यानंतर कान्होजींनी अचलोजींचा वध करून सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला आणि घडलेला सगळा प्रकार राजाराम महाराजांना कळवला.

 

राजाराम महाराजांनी याची सत्यता पडताळून कान्होजींची सरखेलपदी नेमणूक केली. सुवर्णदुर्गावर अत्यंत कमी वयात पाय रोवणाऱ्या कान्होजींनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या पराक्रमामुळे मराठा आरमार अधिकाधिक बलवान होत गेलं. त्यांच्या वाटचालीत आणि पर्यायानं मराठा आरमाराच्या प्रगतीत सुवर्णदुर्गाचा असा मोठा वाटा होता.

 

सुवर्णदुर्गाची लढाई

कान्होजींनी अशी सुवर्णदुर्गापासून वाटचाल सुरू केली असली तरी सुवर्णदुर्ग आणि आंग्रे कुटुंबांचा संबंध संपला नव्हता.

 

1729 साली कान्होजींचं निधन झालं. कान्होजी आंग्रे यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसाजी, धोंडजी असे पुत्र होते.

 

कान्होजी यांच्यानंतर सेखोजी सरखेल झाले. सेखोजी यांच्यानंतर संभाजी आंग्रे आणि तुळाजी, मानाजी यांच्यात गृहकलह निर्माण झाला. 1742 साली संभाजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्यानंतर तुळाजी आणि मानाजी यांच्यामध्ये बेदिली कायम राहिली.

 

तुळाजींनी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जयगड, अंजनवेल, पूर्णगड, पालगड, रसाळगड, रत्नागिरी, प्रचितगड, बहिरवगड, गोवळकोट, कनकदुर्ग, गोवागड, फत्तेगड, यशवंतगड अशी आपली सगळी ठाणी मजबूत केली. स्वतःचं सैन्यही तयार केलं. तुळाजी यांचं हे वाढतं बळ कोकणातल्या इतर सरदारांना सहन होत नव्हतं. पेशवे आणि तुळाजी यांच्यातही वितुष्ट वाढतच होतं.

 

तुळाजींनी कोकण किनाऱ्यावर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंचांची जहाजं लुटल्यामुळे इंग्रजांचा त्यांच्यावर रोष होता.

 

त्यामुळे मराठा आरमार आणि इंग्रजांनी एकत्र येत तुळाजींवर हल्ला करायचं ठरवलं. इंग्रजांनी ही जबाबदारी नौदल अधिकारी जेम्स विल्यम्स यांच्याकडे दिली.

 

जेम्स विल्यम्स

सुवर्णदुर्ग किल्याच्या प्रसिद्ध लढाईची माहिती घेण्याआधी आपल्याला विल्यम जेम्स या ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याची माहिती हवी. विल्यम जेम्स हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1747 साली भरती झाले होते. त्यानंतर 4 वर्षांनी ते कंपनीच्या नौदल विभागात म्हणजे बॉम्बे मरिनमध्ये काम करू लागले.

 

त्यांच्या जहाजाचं नाव गार्डियन असं होतं. हे जहाज डेप्टफोर्ड येथे तयार करण्यात आलं होतं आणि त्याचा वापर मुंबईजवळच्या समुद्रात करण्यात येत होता.

 

ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांवर होणारे हल्ले परतवायचे आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गस्त घालायचं काम त्यांच्याकडे होतं.

 

22 मार्च 1755 रोजी 40 तोफा असलेली प्रोटेक्टर, 20 तोफा असलेली बॉम्बे, 16 तोफा असलेली स्वॅलो, 12 तोफा असलेली ट्राय्म्प, 12 तोफा असलेली व्हायपर आणि बॉम्बे केच ही जहाजं घेऊन जेम्स सुवर्णदुर्गाच्या दिशेने निघाले. त्यांना सात गुराब, सात गलबतं, एक बतेलांचे आरमार आणि 10 हजार सैन्य असं मराठ्यांचं सैन्य मिळालं.

 

2 एप्रिल 1755 रोजी ते सुवर्णदुर्गाजवळ आले आणि त्यांनी दुर्गावर हल्ला सुरू केला.

 

त्यांच्या युद्धनौकांनी किल्ल्यावर शेकडो गोळे टाकले. दुसऱ्यादिवशीही हा हल्ला सुरूच ठेवला. अखेरीस दुसऱ्या दिवशी रात्री किल्ल्यावरच्या दारुगोळ्याला आग लागली. यावेळेस किल्ल्यात 120 माणसं होती. थोड्याचवेळात त्यांनी शरणागती पत्करली. सुवर्णदुर्गापाठोपाठ कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागडही ताब्यात घेण्यात आले. हे किल्ले हातून गेल्यावर तुळाजी विजयदुर्गाकडे निघून गेले. सचिन पेंडसे यांवी मराठा आरमार, एक अनोखे पर्व या पुस्तकात या लढाईचं वर्णन केलं आहे.

 

इंग्लंडमधला सुवर्णदुर्ग

महाराष्ट्रातल्या सुवर्णदुर्गाबरोबर एक सुवर्णदुर्ग इंग्लंडमध्येही आहे. त्याच्या निर्मितीलाही विल्यम जेम्सच कारणीभूत आहेत.

 

भारतात 8 वर्ष काम केल्यावर जेम्स यांनी भरपूर पैसा मिळवला होता. ते इंग्लंडला पोहोचले आणि त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केली. ते 1768 साली कंपनीचे डायरेक्टरही झाले. त्यानंतर इंग्लंडच्या संसदेत खासदारही झाले. 1774 ते 1783 या काळात ते खासदार होते.

 

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अॅन यांनी एक किल्ल्यासारखी इमारत बांधली. तिला सुवर्णदुर्ग (Severndroog) असं नाव देण्यात आलं. आजही ही इमारत उभी आहे.

 

या इमारतीमध्ये संग्रहालय स्थापन करण्याच आलं होतं. तिथं प्रदर्शनंही भरवली जातात.

 

1783 साली विल्यम जेम्स यांचं निधन झालं. त्याच्या पुढच्याच वर्षी या इमारतीाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

 

हा किल्ला लंडन शहराच्या आग्नेयेस शूटर्स हिल नावाच्या भागात असून तिथून किल्ल्यावरुन लंडन शहर पाहाण्याची विशेष सोय केलेली आहे.

ज्याचे आरमार त्याचा समुद्र… ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचं आपलं स्थान बळकट करत होता.

या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं …

Go to Source