जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन : उचगाव मळेकरणी देवी आमराईत पशुबळींवर निर्बंध
वार्ताहर/उचगाव 
उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या आमराई आणि परिसरात पशुहत्या (बकऱ्याचा बळी) प्रथेला पूर्णपणे बंदी असून जिल्हाधिकारी आणि पोलीस खात्याने तसा आदेशही बजावलेला आहे. शिवाय उचगाव ग्रा. पं. आणि ग्रामस्थांच्या बैठकीत पशुबळींवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तरी यापुढे भाविकांनी मंगळवारी आणि शुक्रवारी उचगाव व परिसरात बकरे आणल्यास ते जप्त केले जाईल. तेव्हा याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. कोणीही कितीही यात्रा होणार असल्याची अफवा पसरवल्यास त्याला यात्रा करणारेच जबाबदार राहतील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा उचगाव ग्रा. पं. आणि ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. मळेकरणी देवीची यात्रा म्हणजे काही जणांना एक पिकनिक पॉईंट बनत चालला आहे. भक्ती कमी आणि मौजमजा अधिक असे प्रकार अलीकडेच होत असल्याने याचा उचगावमधील युवा पिढीवर होणारा दुष्परिणाम, नागरिकांच्या आरोग्याला ठरलेली घातक दुर्गंधी, वाहतुकीची  सातत्याने होणारी कोंडी, शेतकऱ्यांच्या शेतवडीत पडणाऱ्या दारूच्या बाटल्या, महिलांसह विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, परिसरातील घरांच्या अंगणात, परसात दारू ढोसणारे तळीराम आणि त्यांच्या महिलांवरील वाईट नजरा या सर्वांचा विचार करून त्रस्त झालेले ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतीने उचगावच्या नागरिकांना भविष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असून यासाठी आताच कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे ओळखून देवीच्या आमराईत आणि परिसरात होणाऱ्या यात्रेवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयाचे बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातील भाविकांनीही मनापासून स्वागत केले आहे. यापुढे पशुहत्येला बंदी असून देवीच्या मंदिरात सर्व विधी, पूजा व इतर कार्यक्रम मंगळवारी व शुक्रवारी नियमितपणे चालू राहतील, याची भाविकांनी नोंद घ्यावी आहे.
अफवांमुळे भाविकांमध्ये गैरसमज
जिल्हाधिकारी, पोलीस खाते, ग्रा. पं. आणि ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातून पशुहत्या हा कायद्याने गुन्हा असल्याने यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. मात्र काही मोजक्याच लोकांकडून यात्रा होणार व बकरी मारण्यात येणार, अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच सदर मालमत्ता ही देसाई भाऊबंद कमिटीची असून त्या मालमत्तेत उचगावमधील कोणीही हक्क मागणार नाही. किंवा देवीच्या मंदिरात येणाऱ्या सर्व उत्पन्नामध्ये कोणीही हिस्सा मागणार नाही. तो पूर्णपणे हक्क देसाई भाऊबंद कमिटीचा आहे. यासाठी नको त्या गोष्टींची अफवा पसरवून भाविकांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. तरी यावर विश्वास ठेवू नये. असा ठराव ग्रा. पं. च्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व सर्व सदस्यांनी प्रसिद्धीस दिली आहे. मळेकरणी देवस्थान हे उचगाव ग्रामस्थांचे आराध्य दैवत असून देवीवरती सर्वांची नितांत श्रद्धा आहे. ती सदोदित अशीच वाढत राहील. देवीचे सर्व उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्यातून बहरतच राहतील. तरी सर्व भाविकांनी याचा विचार करून पशुहत्येसाठी कोणीही येथे मागणी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे सूचित करण्यात आले आहे.