निपाणीला वादळी वारे, वळिवाचा तडाखा

निपाणीला वादळी वारे, वळिवाचा तडाखा

घरे, शाळा, दुकानांचे उडाले पत्रे : अनेक झाडे उन्मळून पडली : लाखोंचा फटका, शहरात रात्रभर विजेविना अंधाराचे साम्राज्य
निपाणी : गेले तीन-साडेतीन महिने तीव्र उन्हाचा तडाखा सोसणाऱ्या निपाणी शहराला सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा सोसण्याची वेळ आली. अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे शहरातील जुना पी.बी. रोड, अशोक नगर, भीम नगर, शिवाजीनगर, शिरगुप्पी रोड या भागात झाडे अक्षरश: उन्मळून पडली. घरे शाळा तसेच दुकानांचे पत्रे उडून गेल्याने नागरिक तसेच व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सोसावा लागला. झालेल्या या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे. पावसाबरोबरच विजेचा कडकडाट आणि वादळी वारे याचा परिणाम म्हणून शासकीय विश्रामगृह आवारातील झाडे, विद्युत खांबही कोसळले. शहरातील अनेक भागात झाडे तसेच विद्युत खांब हे रस्त्याशेजारी लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कोसळल्याने या वाहनांचेही नुकसान झाले आहे. कचऱ्यामुळे आधीच तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर आले होते. सकल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. या सर्वांचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनीसह प्रशासनानेही तात्काळ प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. हातगाडीवाले तसेच फिरत्या व्यापाऱ्यांची वारे व पावसापासून सुटका करून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली.  मंगळवारी दुपारच्या सत्रात निपाणी शहरातील काही भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता तर काही भागात दुरुस्तीचे काम सुरु होते.
घरांचे नुकसान, शेकडो झाडे जमीनदोस्त
निपाणी शहरातील भिमनगर, जामदार फ्लॉट, आडके फ्लॉट, पीबी रोडनजीक दिवेकर कॉलनी, लकडी पूल परिसर, महात्मा गांधी रुग्णालय परिसर, स्मशान वीर हनुमान मंदिर, तासीलदार फ्लॉट, तहसीलदार कार्यालय, बसस्थानक परिसर यासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे, शेडही जमिनदोस्त झाले, घरांच्या भिंतीही कोसळल्या. तसेच विद्युत खांबही कोसळल्याचे प्रकार घडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातील केबलचे जाळे विस्कळीत
मोठ्या प्रमाणात झाडे आणि विद्युत खांब पडल्याने निपाणी शहरातील टीव्ही केबलचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी वेगाने सुरु होते. यातच वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने याचा फटका दुरुस्ती करताना केबल चालकांना बसला. केबल आणि वीजपुरवठा नसल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुख्य रस्त्यांवरील झाडे पालिकेने रात्रीच हटविली
शहरातील मुख्य रस्त्यावरील झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली. यामुळे जुना पीबी रोड, बेळगाव नाका, भिमनगर मार्गावरील रस्ता व इतर मार्गावरील वाहतून खोळंबली होती. सदर मार्गावरील झाडे हटविण्याचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ हाती घेतले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सदर काम सुरु होते. यामुळे मंगळवारी या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नियोजनामुळे मार्ग खुले होताना वाहनधारकांना सोयीचे ठरले.
शैक्षणिक संकुलांना फटका
वादळी वारे आणि पावसामुळे लाखो रुपयांचा फटका बसला. यातच निपाणी शहरातील विद्या मंदिर, म्युनिसिपल हायस्कूल, मराठा मंडळ संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल यासह अनेक संकुलांचे नुकसान झाले आहे. शाळेवरील पत्र्याचे शेड उडून गेले आहेत. विद्या मंदिर शाळा इमारतीवरील पत्र्याचे शेड नजीकच्या भिमनगर मुख्य रस्त्यावर जाऊन पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडली नाही. शाळांसोबतच निपाणीतील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्र्याचे शेड तर शंभर फुटावर जाऊन पडल्याचे दिसून आले.
मोबाईल चार्जिंगसाठी धावपळ…
आज मोबाईल नाही असा एकही व्यक्ती नाही. मोबाईलशिवाय एकही क्षण कोणालाही गमत नाही. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांचे मोबाईल स्वीचऑफ झाले होते. यामुळे मंगळवारी निपाणीत इन्व्हर्टरची व्यवस्था असलेल्या दुकानांमध्ये असो की घरांमध्ये जो तो मोबाईल चार्जिंग करण्यासाठी धडपडत होता. काही जण तर शहरातून नजीकच्या ग्रामीण भागात विद्युत पुरवठा असल्याने तिकडे धावपळ करत असल्याचेही दिसत होते. दरम्यान निपाणीत दुपारच्या सत्रानंतर काही भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता. तर इतर भागात दुरुस्तीचे काम सुरु होते.